
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
शनिवार दिवस! पुणे-तोरणा हा सुमारे ६० कि.मी. प्रवास पाबे घाटातून होणार होता. सकाळी सहाच्या सुमारास रक्त गोठणाऱ्या थंडीत बाईकने भटकंतीला आरंभ केला. खडकवासला धरणाचे विहंगम दृश्य डोळ्यात टिपून पानशेत रस्त्याला वळलो. वाटेत दूरवर असलेला सिंहगड धुक्यामुळे धूसर दिसत होता. तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी अर्थात वेल्हे या तालुक्याच्या गावी जाण्यासाठी पानशेत रस्ता सोडून डावीकडचा फाटा घेतला. वेल्हे रस्ता अरुंद अन् नागमोडी वळणाचा आहे. पुढे एका टपरीवर चहाचा आस्वाद घेत दूरवर पसरलेल्या डोंगररांगा डोळ्याचं पारणं फेडत होत्या. कुडकुडणाऱ्या थंडीत अंगावर पडणारी कोवळी सूर्यकिरणं सुखावणारी होती. दरम्यान आम्हाला पुण्याहून सहा भटक्यांचा गट येऊन मिळाला. भटक्यांना वाटेत भटके गवसतातच हा साक्षात्कार अन् भटकंतीचा आनंद द्विगुणित झाला! वाटेत नजरेस पडणारे निसर्ग सौंदर्य रममाण करणारे होते, ते कॅमेरात कैद करत वेल्हे गाव गाठलं. एका हॉटेलात न्याहारी केली अन् थेट तोरणा किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो.
पुणे जिल्ह्यातील दुर्गकोटातील अतिदुर्गम व अतिविशाल म्हणून सह्याद्री पर्वतरांगेत वसलेला तोरणा किल्ला प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स. १६४७ साली सर्वप्रथम हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव ‘तोरणा’ असे ठेवण्यात आले. या किल्ल्याच्या प्रचंड विस्तारामुळे शिवाजी महाराजांनी याचे नाव बदलून ‘प्रचंडगड’ असे ठेवले.
शिवरायांच्या जयघोषासह गड चढाईला आरंभ केला. तोरणा किल्ल्याची चढाई मध्यम प्रकारची आहे. आजूबाजूला कारवी अन् मधूनच जाणारी आडमोडीची वाट उत्साहीत करत होती. किल्ल्याच्या मध्यावर पोहोचल्यानंतर गुंजवणी धरणाचं दिसणारं विहंगम दृश्य थकलेल्या शरीराला उत्साह देणारं होतं. मध्यापासून माथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी दीड तासाचा अवधी लागतो. कठीण चढ असलेल्या ठिकाणी चांगलीच दमछाक होत होती. तोरणा किल्ला विस्ताराने प्रचंड असल्याने भटक्यांची परीक्षा घेणारा वाटत असला तरी ठिकठिकाणी कठडे असल्याने चढाई अवघड वाटत नव्हती. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगाला स्पर्श करून जात होती. काही पायऱ्या चढून माथ्यावर पोहोचताच बिनी दरवाजा व या दरवाज्यातून आत शिरल्यावर कोठी दरवाजा लागला. तोरणा किल्ल्याच्या अस्तित्वाची जाणीव करून देणाऱ्या वास्तू नजरेस पडत होत्या. खोकड टाके इतिहासाची साक्ष देत होते. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानने किल्ल्यावर मोठं काम उभारलेय. मेंगाई मंदिराच्या उजव्या दिशेने पायवाटेने चालत जाताना हनुमान बुरुज व भेल बुरुज नजरेस पडले. तोरणा किल्ल्यावर दोन माच्या लागतात एक झुंजारमाची व दुसरी बुधलामाची! झुंजारमाचीकडे जाण्याचा मार्ग कठीण होता, पावसाळ्यात या माचीकडे जाण्याचे धाडस न केलेलेच बरे!
बुधलामाचीकडे जाण्यासाठी कोकण व चित्त हे दोन दरवाजे लागले. या माचीकडे जाणारी वाट अवघड आहे. मात्र कोकण प्रदेशाचे सुंदर दर्शन व राजगड किल्ला येथून स्पष्ट दिसल्याने थकवा उत्साहात विलीन झाला. बुधलामाचीच्या दक्षिणेकडील एक डोंगरफाटा थेट राजगड किल्ल्यापर्यंत जातो. गड न्याहाळताना शिवाजी महाराजांनी याचं नाव ‘प्रचंडगड’ का ठेवलं याचा प्रत्यय येतो.
बुधलामाचीहून पुढे आम्ही अवघड ट्रेक करायचं ठरवलं. हातात काठी घेऊन दूरवर दिसणारा डोंगर सर करावयाचा होता. सावली दिसेल तेथे विसावा अन् कारवीचा आधार घेत तो अभेद्य डोंगर चढायचा होता. कारवी एवढी वाढलेली होती की सावलीतून अनवट वाट तुडवित होतो. घनदाट कारवी प्रथमच बघत होतो. घसरण असल्याने अक्षरशः पाय घसरून पडण्याची दाट शक्यता होती, हातांच्या सहाय्याने कसा-बसा डोंगर सर करत होतो. एका क्षणाला उगाच स्वतःला आव्हान दिलं असं वाटलं, मात्र जिद्द माघार घेईना! अखेर आव्हानं अंगावर घेत डोंगर सर केला, गगनचुंबी भगवा डौलात फडकताना दिसला अन् परत थकवा उत्साहात विलीन झाला. चौफेर नजर फिरवून निसर्ग सौंदर्य कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याचा मोह आवरला नाही. जरा वेळ त्या उंच डोंगरावरच अंग टेकवलं अन् निळ्याशार आकाशाकडे बघत विसावा घेतला.
डोंगर उतरणं सोपं नव्हतं, घसरण होती. झाडांचा आधार घेत एक-एक पाऊल पुढे टाकत उतरताना नाकी नऊ आले.
घनदाट कारवीमुळे वाट चुकलो अन् इकडे-तिकडे भटकत बसलो. वाट गवसत नव्हती. कारवीची सावली असली तरी जीव कासावीस झाला. एकदाची बुधलामाचीकडे जाणारी वाट गवसली अन् या थरारक ट्रेकने पूर्ण विराम घेतला.
चारच्या सुमारास कोकण दरवाजा गाठून विसावा घेतला, पाच वाजता किल्ला बंद होणार होता. पाय ठणकायला लागले होते. वीसेक मिनिटात बिनी दरवाजा गाठला. गडउतार होताना चहू बाजू पसरलेलं आकर्षित करणारं विहंगम निसर्ग सौंदर्य डोळ्यात साठवू पाहात होतो. अवघड उतार असला तरी थकवा मुळीच जाणवत नव्हता. सहाच्या दरम्यान गडउतार होऊन वेल्हे गाव गाठलं. आम्हा आठ भटक्यांचा जीव भुकेने तळमळत होता, एका हॉटेलात चिकन, झणझणीत रस्सा अन् भाकरीवर ताव मारला. घनदाट अन् आडमोडीच्या पाबे घाटातून रात्री नऊच्या सुमारास पुणं गाठलं!