
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पूर्णा : शहरापासून सुमारे पाच कि.मी. अंतरावरील गौर च्या शिवारात एका इसमाचा धारदार शस्त्राने वार करुन निर्दयपणे खून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गाव आणि परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
गौर येथील जयवंतराव नारायणराव शिंदे (५७) हे गट क्रमांक ११३ मधील आपल्या शेतीमध्ये गहू भिजवण्यासाठी मंगळवारी गेले होते. गहू भिजवून झाल्यानंतर संध्याकाळी घरी येणे अपेक्षित होते. तथापि ते रात्री तर आलेच नाही शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी सुध्दा न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी गुरुवारी सर्वत्र शोधाशोध केली. त्यावेळी एका अडगळीत कोणी तरी इसम पडल्याचे दिसून आले. जवळ जाऊन हाताने हलवून बघितले असता सदर व्यक्ती मृतावस्थेत असून ते जयवंतराव शिंदेच असल्याचे निष्पन्न झाले. अधिक पडताळणी केली असता मयत जयवंतराव शिंदे यांच्या पोटावर, मांडीवर आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या बऱ्याच खूना असल्याचे दिसून आले. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. हां हां म्हणता ती खबर वाऱ्यासारखी गावभर पसरली.
या गंभीर प्रकरणाची खबर कळताच चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस अधिकारी शिवप्रकाश मुळे, पोउनि. प्रकाश पंडित, सूर्यकांत केजगीरे, सावंत, विशाल बनसोडे, मोहम्मद शरीक, पोलीस पाटील रामकिशन पांचाळ यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. उपविभागीय पोलीस अधिकारी पांडुरंग गोफणे यांनी सुध्दा घटनास्थळी आवर्जून भेट दिली व तपासकामी उपयुक्त होऊ शकतील अशा आवश्यक सूचना कर्तव्यावरील पथकाला दिल्या. वरिष्ठांच्या आदेशानुसार परिस्थितीचे गांभीर्य ओळखून श्वान पथक व फॉरेन्सिक पथकालाही त्या ठिकाणी पाचारण करण्याचे निर्देश दिले असावेत. त्याचबरोबर नांदेड येथील पोउनि. आर. पी. चौधरी, कर्मचारी के.बी. आंधळे, एम्.एन्. कसबेवाड, श्वान जून यांनी घटनास्थळी व परिसरात आरोपींचा शोध घेतला. शिवाय शवविच्छेदनही घटनास्थळीच करण्यात आले.
मृतकाच्या शरिरावर प्रथम दर्शनी तीक्ष्ण तथा धारदार (हत्याराचे) शस्त्राचे घाव दिसून आले असल्याने हा प्रकार घातपाताचाच असावा, असं पोलिसांना वाटणं स्वाभाविक होतं. तद्वत त्याच दिशेने पुढील तपास सुरु केला असावा असं म्हटलं तर गैर ठरु नये. मृतक जयवंतराव यांच्या मुलाने पोलिसांकडे तक्रार दिल्याचे समजते परंतु त्याने संशयिताचे नाव सांगितले का नाही, याचा मात्र तितकासा उलगडा झाल्याचे समजले नाही.
दरम्यान दै.चालू वार्ताने या प्रकरणी खोलात जाऊन या खूनामागील रहस्य आणि मागोवा जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, समजलेली माहिती अत्यंत धक्कादायक अशीच म्हणावी लागेल. जयवंतरावांचा खून ठरवूनच केल्याचे त्यातून जाणवले गेल्यास आश्चर्य वाटू नये. ज्याने जयवंतराव शिंदे यांचे जीवन संपवले, त्याची व शिंदे यांची आदल्या रात्री शेतात पार्टी झाल्याची माहिती काही जणांकडून दबक्या आवाजात ऐकावयास मिळाली. पार्टीच्या वेळी काही तरी निश्चितच इपरित घडले असावे. पोटात उतरल्यानंतर कधी काय होईल हे सुध्दा सांगणे कठीण असते. नक्कीच बिनसले जाऊ शकते. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन शिवीगाळी झाली असावी. ज्यामुळे संताप अनावर होऊन समोरच्या व्यक्तीला धारदार शस्त्राचा वापर करून जयवंतराव शिंदे यांचे जीवन संपवण्यापर्यंतचे टोकाचे पाऊल उचलणे भाग पडले. त्यामुळे आणखी खोलात जाऊन हे प्रकरण आणखी छेडले असता ज्याने जयंतरावाना कायमचे संपवले, त्याने काही कालावधी पूर्वी शिंदे यांच्याकडून दहा लाख रुपये उसने घेतल्याचे समजते. त्या रकमेच्या बदल्यात शिंदे यांना त्याने आपल्या मालकीची जमीन लिहून दिली होती. म्हणजेच रितसर उपनिबंधकांच्या कार्यालयात खरेदी खतही झाल्याचे समजते. सदरचे खरेदी खत हे जयवंतराव शिंदे यांच्या मुलाच्या नावे केल्याचे बोलले जात आहे. कदाचित ती जमीन व त्यापोटी दिलेली रुपये दहा लाखांची रक्कम या दोन्ही बाबीच जयंतरावाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या जाणे असू शकतात असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. तथापि या सर्व वरवरच्या बाबी असल्या तरी वास्तव आणि सत्यता नेमकी काय असावी हे पोलीसी खाक्या दाखवताच आरोपिताकडून पुढे येऊ शकेल यात शंकाच नाही. परंतु ज्या बाबी पत्रकार म्हणून मिळवणे शक्य वाटले, त्या मिळवण्याचा प्रयत्न झाला आहे. कदाचित त्याचाही पोलीस तपासात एक धागा म्हणून निश्चितच उपयोग होऊ शकेल. समाजाचा घटक म्हणून जे करणे आवश्यक वाटले, तो प्रयत्न झाला एवढेच. त्याचा कोणी गैरसमज करुन घेऊ नये तथा तसा गैरवापरही होता कामा नये एवढेच. खेदाची बाब हीच की, हा सारा भयानक प्रकार होण्याअगोदर (पैशाचा व्यवहार झाला तेव्हापासून काही दिवस अगोदर पर्यंत) जयवंतराव व आरोपिताचे संबंध अगदी घरच्या सारखे होते असेही समजले आहे. जयवंतरावांच्या गैरहजेरीत आरोपीत दूध सुध्दा काढून आणून देत असे. असं वाईट कृत्य त्यांच्या हातून घडू शकेल असं कोणालाही खरं वाटतच नव्हते अशीही चर्चा ऐकायला मिळाली. तथापि झाला तो प्रकार वाईटच म्हणावा लागेल. शेवटी काही जरी असले तरी आरोपी हा आरोपीच ठरला जातो. चुकीचं समर्थन किंवा चुकीला माफी ही नसतेच. शेवटी तोही पोलिसांच्या तपासाचा भाग ठरला जाणे स्वाभाविक आहे.