
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
तुम्ही १५-२० रुपयांत पाण्याची बाटली विकत घेतली आणि पाणी प्यायल्यानंतर ती फेकून दिली. तर या बाटलीचा ९० टक्के भाग २७-२८ व्या शतकात विघटन / नष्ट होईल. यास सुमारे ४५० ते ५०० वर्षे लागतील.
दर ६० मिनिटांनी ६० दशलक्ष बाटल्या विकल्या जात आहेत, हा कोट्यवधींचा व्यवसाय आहे. एकट्या हिंदी महासागरात सुमारे २८ पॅचेस (प्लास्टिक पर्वत) तयार झाले आहेत. प्राणी मरत आहेत, मासे, समुद्री जीव मरत आहेत. त्यांच्या पोटामधे प्लास्टिक सापडत आहे. पुढील क्रमांक तुमचा आणि माझा आहे , आपल्या रक्तामधे व नव मातांच्या दूधामधेही प्लास्टिकचे अंश सापडत आहेत.तुम्हाला येणाऱ्या पिढीला नक्की काय द्यायचे आहे याचा आज आत्ता विचार करावा लागेल.
म्हणूनच प्रत्येकाने किमान एका लहान कामाला आजपासून सुरूवात करा. अगदी घरातील लहानांपासून ते थोरांपर्यंत कुणीही सहज करू शकेल , शक्यतो घरचेच पाणी जवळ ठेवा , बाहेर पाण्याची बाटली घेतलीच तर लगेच फेकून देऊ नका. प्रत्येक घरामध्ये दररोज एक किंवा जास्तच प्लास्टिकच्या पिशव्या येतात, (उदा. तेल पिशवी, दूध पिशवी, किराणा पिशवी, शैंपू, साबण, मॅगी, कुरकुरे, इ.)
या पिशव्या ऊघडताना / कापताना कोपरे / तुकडे वेगळे करू नका , हे तुकडे रिसायकल होत नाहीत , पिशवीलाच ठेवले तर रिसायकल होतील.
या पिशव्या आपल्याला कचऱ्या मध्ये न टाकता पाण्याच्या बाटली मध्ये टाकायच्या आहेत. एकदा बाटली भरली की ती व्यवस्थित टोपण घट्ट लावून कचऱ्यात टाकू शकता. जेणेकरून विस्कटलेले प्लास्टिक जनावरे खाणार नाहीत. प्लास्टिक कचऱ्याची आणि पाण्याच्या बाटलीची व्यवस्थित विल्हेवाट लागेल , रिसायकल होईल , रस्ते व ईतर बांधकामातही वापर होऊ शकतो. कचरा विभागाला कचरा जमा करायला पण सोयीस्कर होईल. एवढ्या एका लहान कामातून पर्यावरण, पृथ्वी आणि येणाऱ्या पिढीला खूप मोठा फायदा होईल. हे काम प्रत्येकाने जमेल त्या वेळात, जमेल त्या पद्धतीने १०० % करण्याचा मनापासून प्रयत्न करा. शहरांपासून ते गावागावातील प्रत्येक घरात ही चळवळ उभा राहण्याची काळाची गरज झाली आहे. हीच गरज ओळखून प्रत्येक घराने या शुभ कार्याला सुरूवात करावी ही नम्र विनंती.
जन सहभागातून प्लास्टिक नियोजन युक्त भारत.