
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी/पाथरी : कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील जीवावर बेतला जाणारा कट पॉइंट आज पुन्हा एकदा जीवघेणा ठरला. एका राजकीय पक्षांचा पदाधिकारी आपल्या बाईक वरुन कट मारत होता तेवढ्यात नांदेड कडे जाणाऱ्या एका भरधाव वेगातील जीपने त्या बाईकला जबरी धडक दिली त्यात एकजण जागीच ठार झाला तर सोबतचा गंभीर जखमी झाला आहे. या भीषण अपघाती मृत्यूमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना आज बुधवार सकाळी घडली आहे.
पाथरी तालुका राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष शेख खालेद हे आपला मित्र शेख मोहम्मद शेख जलील हे बाईकने ६१ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावरुन इंदिरा नगरमधील आपल्या घरी जात होते. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील कमानी समोरील कट पॉइंट वरुन वळण घेत होते. तेवढ्यात माजलगावहून नांदेड कडे जाणारी एक क्रुझ जीप (एम्.एच्. २६ ए.के. ३३६०) ही भरधाव वेगाने आली. वेगावर नियंत्रण न ठेऊ शकल्यामुळे का बेजबाबदारपणे वाहन चालविल्यामुळे सदर जीपचा व बाईकचा भीषण अपघात झाला. त्यात शेख मोहम्मद (३५) हे जागीच ठार झाले तर जखमी शेख खालेद हे गंभीर जखमी झाले.
या भीषण अपघाताची भणक लागताच गस्तीवरील पो. ना. पिंपळापुरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेला पुढील उपचारासाठी प्रथम परभणी येथे तर नंतर औरंगाबाद येथे रवाना केले. दरम्यान अपघातानंतर काही वेळातच जीप चालक धम्मसागर चंद्रकांत आवटे (३२) रा. सम्राट कॉलनीत वसमत याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
आठ वर्षीय बालकांचा तलावात बुडून मृत्यू
“”””””””””””””””'””””””””””””””””””'”””””””””
गंगाखेड येथील एक आठ वर्षीय मुलगा पालम येथील आपल्या आजोबांकडे आला असता त्याचा तलावात पडून बुडून मृत्यू झाला.
गंगाखेड येथील बरकत नगरमध्ये राहाणारे शेख रफीक शेख खाजा यांची पत्नी कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आपले वडील शेख नांदूर शेख इस्माईल यांच्याकडे मागील दहा दिवसांपासून राहायला आली होती. या महिलेचा आठ वर्षीय मुलगा शेख अरसलान हा आज बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास तलावात शेजारी खेळत होता. खेळत असताना तो तलावात पडला.
या घटनेची खबर पोलिसांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने शेख अरसलान यांचा शोध घेतला असता तब्बल अर्ध्या तासाने त्याचा मृतदेह आढळून आला. उपचारासाठी अरसलान यास ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह पालकांच्या स्वाधीन करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास बीट जमादार पाटील करीत आहेत.