
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागील चार-पाच दिवसापूर्वी पैठण येथील एका कार्यक्रमादरम्यान क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,भारतीय संविधानाचे निर्माते,भारतरत्न,डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांनी शासनाच्या अनुदानावर अवलंबून नव्हे,तर भीक मागून शाळा उभारणी (शिक्षण संस्था) उभारले असल्याचे बेताल व अपमानजन्य वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ
पुण्यातील पिंपरी येथील समता सैनिक दलाचे भीमसैनिक मनोज गरबडे यांच्याकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या दरम्यान सदर घटनेचे वृत्तांकन करणाऱ्या पुणे येथील न्यूज 18 लोकमतचे पत्रकार (प्रतिनिधी) गोविंद वाकडे हे या प्रकरणी सामील असल्याचा ठपका ठेवत त्यांना अटक करण्यात आली तसेच खोटा आरोप करून त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा व हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड जिल्ह्याच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त केला.
पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावरील खोटे गुन्हे व केलेला कट म्हणजेच लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर घाला घालण्यात आला असून तात्काळ प्रशासनाने पुणे येथील न्यूज येथील लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्ह्यासह मुखेड तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा निवेदनाद्वारे प्रशासनाला इशारा देण्यात आला.
यावेळी बोलताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे,नांदेड जिल्हा सचिव पत्रकार भारत सोनकांबळे यांनी पत्रकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही असे जाहीर मत व्यक्त करत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल केलेले अपमानकारक वक्तव्य देशाहितासाठी अतिशय लज्जास्पद व निंदनीय बाब आहे.सरकार जाणीवपूर्वक यंत्रणेचा वापर करून पत्रकारांवर ठपका ठेवत पत्रकारांची मुस्कटदाबी करत आहे. भारतीय संविधानाने दिलेल्या कलम १९ चे शासन उल्लंघन करत असून लोकशाही मार्गाने लिहिण्याचे,बोलण्याचे,अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार बांधवांनी वेळोवेळी एकजूट दाखवावी अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नांदेड जिल्ह्याचे व मुखेड तालुका पदाधिकारी यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार मुखेड यांची भेट घेऊन निवेदन दिले. पत्रकारांच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात अशी या निवेदनाद्वारे पत्रकारांनी मागणी केली. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे,नांदेड जिल्हा सचिव पत्रकार भारत सोनकांबळे,तालुका सहसचिव आसद बल्खी,विठ्ठल कल्याणपाड (ता.उपाध्यक्ष), सचिव,मोतीपाशा पाळेकर,तालुकाध्यक्ष जयभीम सोनकांबळे, इत्यादींची यावेळी उपस्थित होती.