
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ट्रॅक्टरने मुरुम नेण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या विभागीय अधिकारी आणि कोतवाल यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.जुना धामणगाव येथील मंडल अधिकारी कार्यालयात बुधवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ही कारवाई झाली.मिळालेल्या माहितीनुसार,लाच घेताना रंगेहात पकडलेल्या मंडल अधिकाऱ्याचे नाव देविदास रामचंद्र उगले (५६) असे असून कोतवालचे नाव राहुल साहेबराव तायडे (३२) असे असून कोतवाल राहुल तायडे यांच्यामार्फत अधिकारी उगले यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती.करारानंतर २० हजार रुपयांत सौदा पक्का झाला.त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठून या प्रकरणाची तक्रार दिली.लाचेची ही रक्कम बुधवार दिनांक २१ डिसेंबर रोजी सायंकाळी जुना धामणगाव येथील मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात देण्याचे ठरले.त्यानुसार एसीबीच्या पथकाने कार्यालयाच्या आवारात सापळा रचून देविदास उगले व राहुल तायडे यांना तक्रारदाराकडून लाच घेताना रंगेहात पकडले.या दोघांविरुद्ध धामणगाव रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.