
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या बातम्याने जागतिक पातळीवर सर्वत्र कमालीची चिंता व्यक्त केली जात आहे. तेथील कार्यालये आणि सर्व बाजारपेठा बंद आहेत. इतकेच नाही तर चीनमधील दवाखान्याचे फोटो दाखवून भारतीय लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. त्याचाच गैरफायदा घेऊन सामान्य जनतेची लूट करण्यासाठी मोठ्याप्रमाणात दलाल सुध्दा कार्यरत आहेत अशा एक ना अनेक संतापजनक बातम्या प्रसारित करुन भारतीय जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे तथापि या सर्व बातम्या चुकीच्या, धादांत खोट्या व अतिरंजित असल्याचा घणाघात करीत त्यासाठी कोणीही घाबरण्याची आवश्यकता नसल्याचे सांगून चीनमध्ये वास्तव्यास असलेले भारतीय डॉ. अचल श्रीखंडे यांनी तमाम भारतीयांना दिलासा देण्याचे पूण्य काम केले आहे.
डॉ. श्रीखंडे यांनी पुढे असेही सांगितले आहे की, चीनमध्ये सर्व नागरिक रस्त्यांवर मोकळे फिरत आहेत, आनंद घेत आहेत. तेथील सर्व क्वॉरन्टाईन सेंटर्स बंद करण्यात आली असून ज्यांना कोरोनाची लक्षणे आहेत, अशांना ७ दिवस घरातच राहावं लागतं. झिरो कोविड पॉलीसी मागे घेतल्याने तेथील लोक रस्त्यावर मोकळे व आनंदाने फिरत आहेत. मॉल्स मध्येही जात असून तेथे कशाचीही चिंता नसल्याचे ते म्हणाले.
डॉ. श्रीखंडे पुढे असेही म्हणाले की, चीनमधला व्हेरिएंट ॲमिक्रॉन आहे. त्यांच्या तुलनेत अधिक प्रभावी असलेला डेल्टा व्हेरिएंटमधून भारतीय नागरिक गेलेले आहेत. त्यामुळे चिंता करण्याचे अजिबात कारण नसून कोविडने थैमान घातल्याचे या ज्या बातम्या पुढे येत आहेत, त्या निव्वळ चुकीच्या असून भारतीयांना काळजीचे कारण नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
चीनमध्ये ऑक्सिजन ची कमतरता नाही, हॉस्पिटल सुध्दा भरलेली नाहीत. बहुतांश रुग्ण असिममेंटिक आहेत. मी ज्या रुग्णालयात काम करतो तेथे अशी कोणतीही स्थिती नाही. रुग्णालये रुग्णांनी भरलेली नाहीत. ऑक्सिजनची कमतरता नाही. लोकांना व्हेंटीलेटरवर ठेवण्याची गरज नाही. मृत्युचा दर अगदी अल्पसा असून तो केवळ वयाची ६० वर्षे किंवा त्यापुढील काही रुग्णांमध्ये असल्याचे डॉ. श्रीखंडे यांनी सांगितले आहे.
किंबहुना हे सारे थोतांड असून अशा चुकीच्या व अतिरंजित बातम्यांची मुळीच काळजी करु नये असा दिलासा देण्याचे काम डॉ.श्रीखंडे यांनी एकप्रकारे केले आहे असे म्हटले चुकीचं ठरु नये.