
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नागपूर : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकल्यानंतर अमरावती येथील उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
हे प्रकरण दाबण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस यंत्रणेवर दबाव आणला का, याची चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत मागविण्यात येईल, अशी घोषणा गृह विभागाचे प्रभारी मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात चौकशीत टाळाटाळ केल्याप्रकरणी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्याही चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
भाजपचे राम सातपुते यांनी अहमदनगर जिल्ह्यात ख्रिश्चन मिशनर्यांमार्फत सुरू असलेल्या धर्मांतराचा मुद्दा लक्षवेधीद्वारे सभागृहात मांडला. त्यावेळी अपक्ष सदस्य रवी राणा यांनी अमरावती येथे उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. उमेश कोल्हे यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली होती. त्यामुळे धर्मांध मुस्लिम तरुणांनी त्यांची गळा चिरून हत्या केली. मात्र, त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांनी ही केस दडपण्याचा प्रयत्न केला. फोन करून पोलिस यंत्रणेवर दबाव आणला. धार्मिक कारणातून ही हत्या झाली असताना या हत्येला दरोड्याचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यावर मंत्री शंभूराज देसाई यांनी ही केस भरकटविण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला का, याची चौकशी करून त्याचा अहवाल पंधरा दिवसांत गुप्तचर आयुक्तांमार्फत मागविण्यात येईल, अशी घोषणा केली.