
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भूमी अभिलेख कार्यालयात दलालांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असून दलाल व चिरीमिरी शिवाय शेतकऱ्यांची कोणतीही कामे होत नाहीत. महिनोन्महिने किंबहुना वर्षं वर्ष फेऱ्या मारल्या तरी कोणताच कागद हलत नाही. हेलपाटे मारुन कित्येकांच्या चपला बाटल्या जात आहेत. परिणामी शेतकऱ्यांची हेळसांड व कमालीची पिळवणूक होतेय. त्या निषेधार्थ तीव्र संताप व्यक्त करुन हेलपाटे मारणाऱ्या संबंधित शेतकऱ्यांना मनसेतर्फे मोफत चप्पल वाटपाचा उपक्रम हाती घेतला आहे.
सामान्य माणसे आपली कामे केली जावीत या हेतूने भूमी अभिलेख कार्यालयात महिनोन्महिने हेलपाटे मारीत असतात. रितसर अर्ज करा किंवा हात जोडून आर्जव करा, त्याचा कोणताही परिणाम भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी वर्गावर होत नाही. साधा कागदही हल्ला जात नाही. तथापि तेच काम जर दलालांच्या मार्फत गेले शिवाय चिरीमिरी दिली तर आणि तरच ती कामे आणि तीही तत्परतेने केली जातात. दलालांचा सुळसुळाट व भ्रष्टाचाराची बजबजपूरी बनलेले परभणीचे भूमी अभिलेख कार्यालय शेतकऱ्यांची हेळसांड व पिळवणूक करीत आहे. परिणामी हेलपाटे मारुन मारुन कित्येकांच्या चपला बाटल्या जात आहेत. घर किंवा जमीनीबाबतची कोणतीच कामे हाताळली जात नाहीत. हजारो प्रकरणे प्रलंबित पडली आहेत. पैसे घेतल्याशिवाय तेथील कर्मचारी एकही काल हलवत नाहीत. वरिष्ठ अधिकारी सुध्दा लिप्त असल्यामुळे त्यात मुख्यतः लक्षच घालत नाहीत. भूमी अभिलेख कार्यालयातील या गलथान कारभाराच्या विरोधात मनसेचे जिल्हा संघटक सोनू लाहोटी यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तद्वत त्याच निषेधार्थ मनसेतर्फे मंगळवार, दि. २७डिसेंबर २२ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ०६ वाजे दरम्यान शेतकऱ्यांना मोफत पादत्राणे (चप्पल) वाटपाचा एक आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, अर्जुन टाक, अंकुश शेट्ये, श्रीकांत पाटील, शुभम मुंदडा, अमोल कुल्ले यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली जाणार आहे. बघूया, या चप्पल वाटप उपक्रमाचा भ्रष्टाचाने लिप्त अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल, ते येणाऱ्या काळात दिसून येणारच आहे.