
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपसरपंचांच्या निवडीची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्यामुळे गावगाड्याच्या कारभाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे.
१८ डिसेंबर २०२२ रोजी १२७ पैकी ११९ ग्रामपंचायतींमध्ये पार पडलेल्या निवडणुकीत सरपंचांची जनतेतून थेट निवड झाली आहे. तथापि उपसरपंचांची निवड मात्र तशी न होता ती निवडून आलेल्या सदस्यांमधून केली जाणार आहे. ती निवड प्रक्रिया सध्या बाकी असून ती जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात म्हणजेच २ ते ५ या दरम्यान पार पाडली जाणार आहे. निवडून आलेल्या सरपंचांनी कारभाराची सुत्रे हाती घेतली असली तरी उपसरपंच निवडीपर्यंत मात्र ग्रामपंचायतींच्या सुचारु कारभाराला सुरुवात करणे नियमांना धरुन नसेल. या निवडणूक प्रक्रियेनंतरच ग्रामपंचायतींच्या पूर्ण रुपातील कारभार अस्तित्वात येणार आहे.
दरम्यान या सर्व प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा थंडीचा मोसम असूनही बऱ्यापैकी तप्त होऊ शकेल. परिणामी मोठ्याप्रमाणात घोडेबाजाराला ऊत येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१८ डिसेंबरच्या निवडणुकीत ११९ ग्रामपंचायतींचे सरपंच व अन्य सदस्यांसाठी झालेल्या मतदानात ८४.१० टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला आहे तर आठ ग्रामपंचायतींमध्ये बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे १२७ सरपंचांनी कारभाराची सूत्रे हाती घेतली परंतु गावगाड्याच्या कारभारात प्रत्यक्षपणे सहभाग असणाऱ्या उपसरपंचांची बाकी असलेली निवडप्रक्रिया निवडून आलेल्या सदस्यांमधून होणार असल्याने सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
त्याचाच परिपाक म्हणून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार उपसरपंचांची निवड प्रक्रिया राबविण्याकरिता सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत. सरपंचांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली जाणारी ही निवड प्रक्रिया ‘गट ब’ पेक्षा अधिक दर्जा असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती निवडणूक निरिक्षक म्हणून करण्यात आली आहे.
विहित नियमावलीत ठरवून दिल्याप्रमाणे सर्व तहसीलदारांनी आपल्या तालुका कार्यक्षेत्रातील सर्व उपसरपंचांची निवड प्रक्रिया पार पाडली जावी असे आदेशात नमूद केले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सर्व गटविकास अधिकारी यांना या आदेशाची प्रत माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. या निवडीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला जाऊ नये, कायदा व सुव्यवस्थेला बाधा येऊ नये यासाठीची पूर्ण तयारी केली असल्याचे समजते.