
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : गंगाखेड तालुक्यातील धारासूर येथील प्राचीन गुप्तेश्वर मंदीराच्या जिर्णोध्दारासाठी सरकार कटिबद्ध असून त्यासाठी लागणाऱ्या निधीची पूर्तता आगामी दोन महिन्यांत करण्यात येईल असे ठोस आश्वासन राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
गंगाखेड मतदार संघातील रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी या प्रकरणी लक्ष्यवेधीद्वारे प्रश्न विचारुन शासनाचे लक्ष्य वेधले असता मंगळवार, दि. २७ रोजी ना. मुनगंटीवार यांनी वरीलप्रमाणे आश्वासित केले. ज्या मंदीराच्या जिर्णोध्दाराची मागणी केली जातेय ते महादेव मंदीर माझेही श्रध्दास्थान असल्याची भावनिकता त्यांनी बोलून दाखवली.
मराठवाडा मुक्ती दिनानिमित्ताने औरंगाबाद येथील आयोजित मुख्य शासकीय कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमारे २१ कोटींचा निधी देण्यात येईल असे घोषित केले होते. त्याच अनुषंगाने आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी लक्ष्यवेधीद्वारे प्रश्न विचारुन आश्वासन तर दिले परंतु त्याची अद्याप पूर्तता झाली नसल्याचे सांगून ती कधी पर्यंत उपलब्ध होईल अशी विचारणा केली. त्यावेळी ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
पंधराव्या वित्त आयोगातील मंजूर आठ कोटी व नंतरचे मंजूर २१ कोटी असे मिळून २९ कोटी अद्याप मिळाले नसल्याचे स्मरण देत आमदारांनी निदर्शनास आणून दिले. प्राचिन काळातील हेमडपंथी पध्दतीचे मंदीराचे बांधकाम असल्याने विशेषत्वाने काळजी घेणे आवश्यक असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगत या कामी असलेला कटाक्ष सभागृहाच्या लक्षात आणून दिला. एकूणच काय तर आगामी दोन महिन्यांत या निधीची पूर्तता होईल हे यावरच शिक्कामोर्तब झाले आहे असे म्हणायला मुळीच हरकत नसावी.