
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी, मनसे, स्वराज्य संघटनेसह अनेक संस्था-मंडळांचाही उस्त्फुर्त सहभाग
परभणी/पूर्णा : येथील वीज महावितरण अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून वाढीस लागलेला मुजोरपणा आणि मस्तवालपणा शेतकऱ्यांना त्रासदायक व वेठीस धरणारा असाच ठरला जात आहे. त्यांच्या जुलमी जाचातून मुक्ती मिळवण्यासाठी आणि समस्त शेतकरी वर्गाच्या न्याय्य हक्कांसाठी आज बुधवार, दि. २८ डिसेंबर २२ रोजी हजारो शेतकऱ्यांनी आक्रोश मोर्चा काढून पूर्णा तहसील व महावितरण परिसर पूरते दणाणून सोडले. तालुक्यातील शेतकरी वर्ग यावेळी कमालीचा संतापलेला होता.
“थ्री आणि सिंगल फेजचे विघटन करण्यात यावे, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करण्यात यावे, शेतपंपांची सक्तीची वीज वसूली बंद करावी, शेतकऱ्यांवरील खोटे गुन्हे रद्द करण्यात यावेत, महावितरणकडून झालेली शेतकऱ्यांची नुकसान भरपाई त्वरीत मिळावी, शेतकऱ्यांना त्रास देऊन मालमत्तांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱे अभियंता वसमतकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेत पाहिजे” या व अशा अनेक गगनभेदी घोषणा देत हजारो संतप्त शेतकऱ्यांनी आक्रोश करीत पूर्णा तहसील कार्यालयावर दिलेली धडक म्हणजे महावितरण कार्यालयालाच धडकी देणारीच ठरली गेली.
सकाळी ठिक १० वाजता टी पॉइंट येथून सुरुवात झालेल्या या आक्रोश मोर्चात हजारो शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करीत सहभाग नोंदवला होता. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, स्वराज्य संघटनेसह अनेक संस्था आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेऊन शेतकरी मोर्चाला भरीव असे बळ दिले. गगनभेदी घोषणांचा निनाद व शेतकऱ्यांचा तीव्र संताप बघून महावितरण कार्यालय आणि पोलीस कमालीचे अडचणीत आल्याचे दिसत होते. त्याचाच परिपाक म्हणून तहसील कार्यालयावर कुच करणारा हा मोर्चा पोलिसांनी मुख्य प्रवेश द्वारावरच रोखण्याचा अटोकाट प्रयत्न केला असता मोर्चेकऱ्यांनी रस्ता अडवून वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला. परिस्थिती अधिकच चिघळली जाऊन कायदा व सुव्यवस्थेला बाधा येतो की काय, जणू याच भीतीने व नाईलाज म्हणून पोलिसांनी अखेर मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यास परवानगी दिली.
महावितरणच्या विरोधात आक्रोश व्यक्त करुन संतप्त मोर्चेकऱ्यांनी तहसील कार्यालय व परिसर पूर्णपणे भयभीत करुन टाकले होते. मागील काही कालावधीपासून महावितरणची वाढीस लागलेली मुजोरी आणि त्यांचा मस्तवालपणा असह्य ठरणारा असल्याचे पटवून देत अगदी कार्यालयच डोक्यावर घेतले होते. त्यावेळी नायब तहसीलदार नितेशकुमार बोलुले यांना दिलेल्या निवेदनात मोर्चेकऱ्यांनी ज्या मागण्या विषद केल्या आहेत, त्या खरोखरच संतापजन्य व क्लेशदायक अशाच असल्याचे जाणवले गेले. पूर्णा तहसील कार्यालयाने यात गांभीर्याने लक्ष घालून त्यांची फिर्याद जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यापर्यंत वेळीच पोहोचतील करावी अन्यथा आंदोलनाचा हा भडका अधिक प्रमाणात कधी उडला जाईल, हे सांगणे कठीण होऊन बसल्याशिवाय राहाणार नाही एवढे नक्की.
या प्रसंगी राष्ट्रवादी युवा कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश काळे, तालुका अध्यक्ष शहाजीराजे देसाई, युवकचे तालुका अध्यक्ष गजानन अंभोरे, सभापती अशोक बोकाळले, गजानन धवन, तुकाराम लोखंडे, दयानंद कदम, शहराध्यक्ष प्रताप कदम यांच्या नेतृत्वाखाली शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. मनसेचे शहराध्यक्ष गोविंद ठाकूर, तालुका अध्यक्ष अनिल बुचाले, स्वराज्य संघटनेचे साहेबराव कल्याणकर, प्रा. सुनील जोगदंड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. सदर निवेदनावर गंगाधर बुचाले, राम बुचाले, शिवराम बुचाले, कैलास बुचाले, श्याम बुचाले, पवन पवार, गोविंद पवार, सुभाष पवार, शेषेराव बुचाले यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्यांचा समावेश त्या निवेदनावर असल्याचे समजले.