
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इंगळी
रविवार दिं १ जानेवारी २०२३ रोजी कामेश्वरी साहित्य मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी कामेरी येथे होणाऱ्या मातृ स्मृती ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कादंबरीकार डॉ श्रीकांत पाटील यांची निवड करण्यात आली असल्याचे संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक श्री दि बा पाटील यांनी जाहीर केले. संमेलनाचे उद्घाटक कोल्हापूर जिल्ह्यातील प्रतिथयश साहित्यिक डॉ चंद्रकुमार नलगे हे आहेत. तर स्वागत अध्यक्ष दि बा पाटील सर आहेत. श्री राजकुमार पाटील श्री शरद तांदळे व श्री धनाजी घोरपडे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. डॉ उदय जाधव व डॉ अरुण घोडके यांचा विशेष सन्मान या सत्रात होणार आहे.
दुसऱ्या सत्रात पुरस्कार वितरण सोहळा व पुस्तक प्रकाशन समारंभ होणार आहे. डॉ बाळासाहेब लबडे, डॉ किर्ती मुळीक, प्रा प्रतिभा सराफ, बबन शिंदे, अंकुश गाजरे, सचिन पाटील , आबासाहेब पाटील, प्राचार्य गो वि कुलकर्णी, डॉ.चंद्रकांत पोतदार त्यांच्या साहित्यकृतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ बाळासाहेब लबडे लिखित ब्लांटेटिया कविता संग्रहाचे प्रकाशन याचे जिल्हाधिकारी श्री गणेश मरकड यांच्या हस्ते होणार आहे. या साहित्यकृतीवर डॉ चंद्रकांत पोतदार भाष्य करणार आहेत. श्री अप्पासाहेब खोत यांच्या कुणब्याची पोरं या ललितलेख संग्रहाचे प्रकाशन श्री दि बा पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यावर डॉ दीपक स्वामी भाष्य करणार आहेत.तिसऱ्या सत्रात होणाऱ्या कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी आनंद लहरी हे भूषविणार असून श्री रवी बावडेकर हे सूत्रसंचालन करणार आहेत. धनाजी दाभोळे ,आनंद खंडागळे, श्री अशोक निळकंठ हे संमेलन यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.
संमेलन अध्यक्ष डॉ श्रीकांत पाटील हे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक असून राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक आहेत. त्यांच्या स्वातंत्र्योत्तर मराठी नाट्यसृष्टी या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य संशोधन पुरस्कार मिळाला आहे तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल या बालकादंबरीला साने गुरुजी पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी बालसाहित्य आणि प्रौढ साहित्यामध्ये विपुल लेखन केलेले असून बालसाहित्यातील फिनिक्स, जिगरबाज गोट्या, सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल तर प्रौढ साहित्यातील लॉकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या कादंबऱ्या खूप चर्चेतील कादंबऱ्या आहेत. शब्दतरंग ,माती आभाळाशी बोले, काळया दगडावरची रेघ हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत तर झाडोरा हा बालकविता संग्रह नुकताच प्रसिद्ध झालेला आहे. त्यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.