
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
पुणे दि.३०- उत्तम आरोग्यासाठी आणि निरोगी पिढी घडविण्यासाठी दैनंदिन आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर गरजेचा असून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त सर्व विभागांनी सामुहिकपणे तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक शालिनी कडू, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सुभाष काटकर, पर्यटन उपसंचालक सुप्रिया करमरकर आदी उपस्थित होते.
श्री.खराडे म्हणाले, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या ग्रामीण भागातील तृणधान्यांना ओळख मिळणे ही अभिमानाची बाब आहे. पूर्वी पौष्टिक तृणधान्याचा आहारात नियमित वापर होत असल्याने नागरिकांचे आरोग्यही चांगले असायचे. आता आहारातून हे पारंपरिक पदार्थ बाजूला झाल्याने आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. नागरिकांना तृणधान्याचे महत्व सांगतांनाच तृणधान्यावर प्रक्रिया करून विविध प्रकारचे पदार्थ तयार करणेदेखील आवश्यक आहे. हे पदार्थ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याचे आरोग्याच्यादृष्टीने महत्वही पटवून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
श्री.काटकर यांनी सादरीकरणाद्वारे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्रत्येक महिन्यात त्या-त्या तृणधान्याच्या महत्वानुसार नव्या पदार्थांची ओळख नागरिकांना करून देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरावर कार्यशाळांचे आयोजन करण्यात येईल. ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा आणि राजगिरा या पश्चिम पट्टयातील तृणधान्यांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात येतील. अंगणवाडीमधून देण्यात येणाऱ्या आहारात या पदार्थांचा समावेश, तृणधान्य महोत्सवाचे आयोजन, मूल्यवर्धन आणि पाककृतींचा विकास, निर्यातवृद्धीचे प्रयत्न आदी विविध उपक्रमाच्या माध्यमातून हे वर्ष साजरे करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या अनुषंगांने सूचना मांडल्या. चांगल्या सूचनांचा उपक्रमात समावेश करून वर्षभर तृणधान्यांचा प्रसार करण्यावर भर देण्याच्या सूचना श्री.खराडे यांनी दिल्या.