दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
मनमानी कारभाराचा आरोप
जव्हार:- लोकशाहीमध्ये शासन आणि प्रशासन यामध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे असून विकासाचा विचार करता जेवढे शासनाचे महत्व असते तितकाच प्रशासनाचा देखील वाटा असतो परंतु जव्हार पंचायत समितीच्या बाबतीत सध्या वेगळेच अनुभव येत असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या ताळमेळ नसल्याचे चित्र मंगळवारी झालेल्या मासिक सभेनंतर उघडकीस आले आहे.या बाबत जव्हार पंचायत समितीच्या सभापती विजय लहारे आणि उपसभापती दिलीप पाडवी यांनी बुधवारी सभापती दालनात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत जव्हार पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांवर मनमानी कारभाराचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे.
या पत्रकार परिषदेत बोलतांना सभापती लहारे यांनी गटविकास अधिकारी हे लोकप्रतिनिधींना जुमानत नसून परस्पर निर्णय घेऊन मागील मासिक सभेतील आढावा घेतला जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.जर अधिकारीच असे परस्पर निर्णय घेत असतील तर लोकप्रतिनिधींची किंमतच उरली नसल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.जव्हार तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या गावपाड्यांचा विकास होण्याकरिता पंचायत समिती सभापती व उपसभापती यांना निवडून दिले म्हणून प्रशासकीय अधिकारीच जर लोकप्रतिनिधींना विश्वाशात घेत नसतील तर येथील विकास खुंटण्याची शक्यता असल्याचा आरोप त्यांच्या कडून करण्यात आला.
प्रकर्षाने प्रशासनाने सुधारणा करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.पंचायत समिती जव्हार येथील गटविकास अधिकारी व त्यांच्याशी संबंधित असलेले सर्व विभाग प्रमुख हे सभापती व उपसभापती तसेच गटनेते यांना कोणतेही काम करताना विश्वासात घेत नाहीत शिवाय मासिक सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आलेल्या विषयावरती प्रशासनाकडून दोन ते तीन मासिक सभा झाल्यानंतरही कोणत्याही प्रकारे त्या विषयाची दखल घेतली जात नाही अशी तक्रार यावेळी सभापती व उपसभापती यांच्याकडून करण्यात आली.
गेल्या दोन वर्षांपूर्वी प्रशासन योग्य प्रकारे सहकार्य करत नाही म्हणून मासिक सभा अर्ध्यात संपवली होती.गणवेश वाटप,पायाभूत सुविधा,शैक्षणिक प्रगती,शालेय पोषण आहार वाटप इत्यादींचा अहवाल चिंताजनक असून गट विकास अधिकारी यांनी शासकीय शिस्तीने काम करण्याची आश्यकता आहे.
विजया लहारे,सभापती,पंचायत समिती,जव्हार
सभापती,उपसभापती या लोकप्रतिनिधींचा आमच्याबाबत गैरसमज झाला आहे. त्यांचे काही गैरसमज झाले असतील तर सभा घेऊन दूर करू.आम्ही सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊ.
समीर वाठारकर,गटविकास अधिकारी,पंचायत समिती,जव्हार
