
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : महापालिका क्षेत्रात मालमत्ता कराचा भरणा न करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिवाय थकीत रकमेची आकडेवारी सुध्दा मोठ्या प्रमाणात येणे आहे. त्यामुळे महापालिकेचा आर्थिक कणा पूरता कोलमडला गेला आहे. त्याशिवाय शहराचा सर्वांगीण विकास करण्याची तीव्र इच्छा असूनही ते काम याच थकीत रकमेमुळे पूर्णत्वास नेणे कष्टप्राय झाले आहे. परिणामी कामगारांचे वेतन व अन्य स्वरूपात देय असलेली रक्कम सुध्दा अदा करणे दूरापास्त होऊन बसले जात आहे. त्याचाच परिपाक म्हणून महापालिका आयुक्त तथा प्रशासक तृप्ती सांडभोर यांनी हजारो कर थकीत नागरिकांना नोटीसा पाठवल्या आहेत तरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने नाईलाज म्हणून मालमत्ता जप्तीची ही मोहीम राबविणे भाग पडत असल्याचे आयुक्तांनी नमूद केले आहे. ज्या ज्या नागरिकांची मालमत्ता कर भरणा करणे बाकी आहेत, त्यांनी तात्काळ ती भरणा करुन महापालिकेला सहकार्य करावे, अशी विनंती केली आहे अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा निर्वाणीचा इशारा सुध्दा नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ माजली जाणे स्वाभाविक आहे. मागील अनेक वर्षांपासून थकीत मालमत्ता कराची रक्कम अदा न करणाऱ्यांची संख्या परभणी महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आहे. रुपये पाच हजार ते पन्नास हजारापर्यंतची ती रक्कम गेली अनेक वर्षे थकीत आहे. शहराचा नागरिक म्हणून ती वेळेच्या वेळी भरणा करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असूही ती भरली जात नाही. परिणामी शहराच्या सर्वांगीण विकासाला तर अडचण येतच आहे शिवाय अधिकारी, कर्मचारी यांचे वेतन आणि अन्य देयके अदा करणे त्रासदायक ठरले जात आहे. मागील कालावधीत ज्यांची पन्नास हजारांपेक्षा जास्त व पाच हजारांपे कमी अशी थकीत रक्कम गेल्या पाच वर्षांपासून भरणा थकीत आहे अशा एकूण एक हजार चारशे ब्यान्नव नागरिकांना नोटीसा बजावल्या आहेत तरीही त्या नोटिसांकडे दूर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे. त्याचाच परिपाक म्हणून ही तातडीची वसूली मोहीम सुरु करण्यात आली आहे. वसूली पथक प्रभाग समिती ‘अ’ मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, जनता मार्केट व मुख्य बाजारपेठ या परिसरात आणि विभागनिहाय घरोघरी फिरत आहेत. त्यांना मालमत्ता कराची ती थकीत रक्कम तात्काळ न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई करता यावी म्हणून महापालिकेने पूरती कंबर कसली आहे. या कारवाईमुळे शहरात प्रचंड खळबळ माजली गेली असली तरी यथायोग्य वसूली न झाल्यास कारवाई ही अट्टळ आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरु नये.
महापालिकेने सुविधा पुरविणे हा जरी अधिकार असला तरी नागरिक म्हणून वेळेवर कर भरणे हा सुध्दा आपला नैतिक अधिकार ठरला जातो. त्यामुळे तिकडे दूर्लक्ष करुन मुळीच चालणारे नाही याचेही विस्मरण होता कामा नये.