दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा जगात सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृती आहे. परंतु युवापिढीवर विदेशी संस्कृतीचा बडगा वाढत चालला आहे.त्यामुळे व्यसन जडल्याने विविध रोगराईचासामना.करावा लागत आहे. कुणाला दारूचे व्यसन तर कुणाला गुटखायचे व्यसन आहे. व्यसनामुळे अनेकांचे कुटूंब उध्दस्त होत आहेत. त्यासाठी नव्या वर्षात नवा संकल्प करुन व्यसनमुक्त होण्याची गरज आहे.
आधुनिक युगातील तरुण पिढी कोणत्या ना कोणत्या व्यसनाने ग्रस्त झाली आहे. त्यामुळे कुणाला सिगरेट चे व्यसन, कुणाला बिडीचे व्यसन तर कुणाला दारूचे व्यसन तर ९० टक्के नागरिकांना तंबाखू, गुटख्याचे व्यसन जडले आहे. व्यसनात व्यर्थचा खर्च होत आहे. एकवेळा व्यसन जडले की, दुसऱ्यांदा व्यसनातून मुक्त होणे अवघड जाते. व्यसन कशाचेही असो व्यसन मुक्त होणे ही काळाची गरज झाली आहे. भारतीय संस्कृतीत पूर्वीच्या काळात भारतात इंग्रजांचे राज्य येण्यापूर्वी कुणीही चहाचा घोट तोंडाला लावत नव्हते. परंतु त्या इंग्रजांच्या काळात भारतीय नागरिकांना मोफत चायपत्तीचे वाटप करुन चहाचे व्यसन लावण्यात आले. अन भारतीय नागरिकांचे आयुष्य घटायला लागले. त्याचप्रमाणे विविध खाद्य पदार्थातही भेसळीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही आरोग्यावर त्याचा परिणाम होऊन अनेकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. हवेत प्रदुषण, पाण्यात प्रदुषण व अन्नातही भेसळ होत असल्याने आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यासाठी व्यसनमुक्त समाज निर्माण होणे ही काळाची गरज आहे.


