दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर: बिलोली तालुक्यातील केसराळी येथील विद्युत पुरवठा करणाऱ्या कांही डीपीचे जळालेले केबल, मोडकळीस आलेले विद्युत पोल व त्यावरील लोंबकाळणाऱ्या जिवंत तारा बदलण्याकडे देगलूर महावितरण कंपनी हि जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने गावकऱ्यांना भविष्यात धोका निर्माण झाला आहे.
बिलोली तालुक्यातील केसराळी या गावची लोकसंख्या ५ हजार इतकी आहे. गावात विद्युत पुरवठा करणाऱ्या महावितरण कंपनीचे ४ विद्युत डीपी आहेत. त्या ४ विद्युत डीपीवरुन गावातील सर्व नागरिकांना विद्युत पुरवठा केलाजातो. परंतु हे विद्युत पुरवठा करणारे काही विद्युत पोल जवळपास ४० ते ५० वर्षांपूर्वी बसवलेले असल्याने ते बुडातून जीर्ण होऊन मोडकळीस आले आहेत. तसेच त्यावरील विद्युत पुरवठा करणाऱ्या जिवंत ताराही पूर्णत: जीर्ण होऊन रस्त्यावर, घरावर लोंबकळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कुठल्याही क्षणी ह्या जीर्ण झालेल्या तारा व मोडकळीस झालेले विद्युत खांबे हे जमिनीवर कोसळून जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महिला सरपंच माधुरी मनधरणे व ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांच्यावतीने देगलूर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात गेल्या ५ महिन्यापूर्वी लेखी निवेदन देवून दुरुस्तीची व नवीन ७ विद्युत पोल बसवण्याची मागणी केली होती. परंतु या मागणीकडे संबंधित देगलूर ग्रामीण महावितरण कार्यालयातील बडे अधिकारी व महावितरण कंपनीच्या दुरुस्तीचे काम करणारे संबंधित गुत्तेदार हे चालढकल करत जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून गावात सुरळीत विद्युत पुरवठा करण्यात यावे अशी गावकऱ्यांच्या वतीने महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मागणी करण्यात येत आहे.


