दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना : मुलीच्या लग्नासाठी सुट्टीवर आलेल्या सीमा सुरक्षा दलातील जवानाच्या दुचाकीला पिकअपने जोरदार धडक दिली. यात जवानाचा जागेवर दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना अंबड तालुक्यातील बीड- संभाजीनगर महामार्गावरील भालगाव फाट्यावरील घडली.
हनुमान यशवंता लिपणे (रा. वडी गोद्री) असे या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचे नाव आहे. हनुमान लिपणे हे आसाम राज्यातील त्रिपुरा या ठिकाणी कार्यरत होते. चार दिवसांपूर्वीच त्यांचा मुलीचा विवाह संपन्न झाला होता. रविवारी त्यांची सुट्टी संपत असल्याने मुलाच्या पुढील शिक्षणासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका शाळेत फिस भरण्यासाठी दुचाकीने गेले होते. मुलाच्या शाळेची फी भरुन वडीगोद्रीकडे गावी परत येत असताना पाठीमागून येणाऱ्या पिकअप गाडीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
मुलाचा पेपर झाल्यानंतर अंत्यसंस्कार
दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात त्यांचा दुर्दवी मृत्यू झाला. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याने सर्व जबादारी त्यांच्यावरच होती. त्यांच्या मुलाचा दहावीचा पेपर असल्याने मुलाने पेपर दिल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आईनंतर मुलाच्या डोक्यावरून वडिलांचे ही छत्र हरवल्याने वडीगोद्री पतीसरातून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.
