जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारेपाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. या कारवाईदरम्यान, भारतीय नौदल समुद्रमार्गे पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या अत्यंत जवळ पोहोचले होते.
हल्ल्यासाठी काही मिनिटे शिल्लक होती, मात्र त्याच वेळी पाकिस्तानकडून सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आली, असा महत्त्वपूर्ण खुलासा भारतीय नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांनी केला आहे.
मुंबई येथे आयोजित नौदलाच्या कार्यक्रमात बोलताना अॅडमिरल त्रिपाठी यांनी ऑपरेशन सिंदूर, भारतीय नौदलाची तयारी, तैनाती आणि आक्रमक भूमिका स्पष्ट केली. या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरदरम्यान उत्कृष्ट सेवेसाठी दोन वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांना ‘युद्ध सेवा पदक’ प्रदान करण्यात आले.
पाकिस्तानकडून सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती
अॅडमिरल त्रिपाठी म्हणाले, आता ही गोष्ट लपलेली नाही की, आम्ही समुद्रमार्गे पाकिस्तानवर हल्ला करण्यापासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर होतो. मात्र त्याच वेळी पाकिस्तानकडून सैन्य कारवाई थांबवण्याची विनंती करण्यात आली, त्यामुळे आम्ही हल्ले थांबवले, असा खुलासा त्रिपाठी यांनी केला.
पश्चिम आशियातील युद्धामुळे समुद्री वाहतुकीवर परिणाम
पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षाबाबत बोलताना त्रिपाठी म्हणाले, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून या भागात २० हून अधिक व्यापारी जहाजांवर हल्ले झाले आहेत. या तणावपूर्ण परिस्थितीत सुमारे १,९०० जहाजे अडकून पडली आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे. युद्धापूर्वी दररोज सुमारे १३० जहाजांची ये-जा होत होती, ती आता कमी होऊन दररोज केवळ ६ ते ७ जहाजांपर्यंत मर्यादित झाली आहे.
समुद्र आता महत्त्वाचे युद्धक्षेत्र
बदलत्या जागतिक परिस्थितीत समुद्र हे आता दुय्यम युद्धक्षेत्र राहिलेले नाही. समुद्र हे आता रणनीतिक शक्ती दाखवण्याचे आणि आव्हान देण्याचे महत्त्वाचे मंच बनत आहेत, ज्याचे परिणाम अनेकदा असंतुलित स्वरूपाचे असतात. तसेच, बदलत्या तंत्रज्ञानामुळे युद्धाची योजना, अंमलबजावणी आणि युद्ध सुरू ठेवण्याच्या पद्धतीत मोठे बदल झाले असून पारंपरिक नसलेल्या आव्हानांना सामोरे जाणे अधिक जटिल झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.
