छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य टिकविण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, या भावनेतून आणि त्यांच्या विचारांच्या प्रेरणेतून महाराणी ताराराणी यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर हिंदवी स्वराज्य टिकविण्याचे कार्य केले,’ असे गौरवोद्गार संभाजीराजे छत्रपती यांनी गुरुवारी काढले.
सरहद पुणे, दिल्ली येथील महाराष्ट्र सदन नवी दिल्ली आणि राज्य सरकारचा मराठी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्ली येथे महाराणी ताराराणी यांच्या ३५१ व्या जयंती वर्षानिमित्त आयोजित महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेनलाच्या निमित्ताने मयूर मसूरकरलिखित ‘छत्रपती महाराणी ताराराणी’ या पुस्तकाचे प्रकाशन संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. महापौर मंजुषा नागपुरे, सरहदचे संस्थापक संजय नहार, विश्वस्त डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, अनुज नहार, गोपाळ कांबळे या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमात अबोली राऊत, डॉ. लीना बोकील, ममता सपकाळ, मेजर डॉ. मोनिका बारणे, अंजू माने, साधना चव्हाण, सुवर्णा गोखले, आशा खेडकर, अलका गुनजाळ, स्वाती डिंबळे यांना छत्रपती महाराणी ताराराणी सन्मानाने गौरविण्यात आले.
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘महाराणी ताराराणी यांच्याकडे उत्तम युद्ध व प्रशासकीय कौशल्य होते. या कौशल्याच्या जोरावर त्यांनी औरंगजेबाशी सात वर्षे लढा देऊन त्याला जेरीस आणले. त्यांचे हे कार्यकर्तृत्व समाजापर्यंत पोहोचू शकले नाही. या पुस्तकाच्या माध्यमातून ताराराणींचे महात्म्य, स्वराज्य टिकविण्यासाठी केलेला संघर्ष समाजपर्यंत पोहोचेल.
नागपुरे म्हणाल्या, ‘मराठा साम्राज्य टिकविण्यासाठी केलेले महाराणी ताराराणी यांचे कार्यकर्तृत्व महनीय आहे. त्या शौर्य, धैर्य असणाऱ्या रणरागिणी होत्या. प्रशासकीय कार्यात महिला अधिकारी अनेक महत्वाच्या भूमिका बजावीत आहेत. हे कार्य करत असताना त्यांचा साहित्य क्षेत्रातील वावर कौतुकास्पद आहे. नागरीक आणि सरकारमधील दुवा असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नागरिक आणि राजकारण्यांमुळे भरड होते.’
तैलचित्रासाठी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतो करतो…
छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र मुंबईतील मंत्रालयात आणि दिल्लीतील महाराष्ट्र सदनात नसल्याचे संजय नहार यांनी प्रास्ताविकात सांगितले. हा धागा पकडून संभाजीराजे छत्रपती म्हणाले, ‘मंत्रालयात आणि महाराष्ट्र सदनात छत्रपती महाराणी ताराराणी यांचे तैलचित्र लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करून त्यांच्याशी संवाद साधतो. तैलचित्राच्या अनावरणासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याबरोबरच वेळप्रसंगी त्यांच्यावर दबाव टाकण्याची भूमिकाही घेतो.
