
दैनिक चालु वार्ता म्हसळा – रायगड प्रतिनिधी – अंगद कांबळे
तहसीलदार कार्यालयात विविध प्रकारची शासकीय कामे करण्यासाठी तालुक्यातून दररोज हजारो नागरिक येत असतात. अनेक वर्षांपुर्वीचे तहसील कार्यालयाचे इमारत परिसरात स्वच्छता गृह बांधण्यात आले आहे. याच इमारतीला लागून पोलीस ठाणे, वनविभाग कार्यालय अशी काही अति महत्वाची शासकीय कार्यालये असून त्यांचा सर्व शासकीय कारभार याच इमारतीमधून होत असल्याने रोजच नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. बांधण्यात आलेले स्वच्छता गृह नेहमीच अस्वछ असते.मागील काही दिवसांपासून या स्वच्छता गृहाला टाळे लावण्यात आले आहेत. तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने नैसर्गिक विधी साठी साहजिकच या ठिकाणी असलेल्या एकमेव स्वच्छता गृहाचा वापर करित असतात. मात्र मागील काही दिवसांपासून या स्वच्छता गृहाला टाळे (कुलप) लावण्यात आले असल्याचा अजब प्रकार तहसील कार्यालयाचे ठिकाणी पहायला मिळत आहे. या अजब प्रकारामुळे दैनंदिन शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून शासकीय अधिकाऱ्यांच्या मनमर्जी कारभारामुळे नागरिकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वच्छता गृहाला टाळे लावले असल्याने सामान्य नागरिकांना या स्वच्छता गृहाचा उपभोग घेता येत नाही मात्र तहसील कार्यालयातील कर्मचारी, पोलीस ठाण्याचे कर्मचारी, वनविभाग कार्यालयाचे कर्मचारी यांना मात्र या स्वच्छता गृहाचा उपभोग घेण्याकरिता किल्ली अधिकाऱ्यांच्या हातात दिलेली आहे, ही किल्ली घेऊन शासकीय कर्मचारी या स्वछता गृहाचा उपभोग घेत असल्याची काहीशी परिस्थिती पाहायला मिळते. त्यामुळे नागरिकांसाठी स्वच्छता गृह बंद असले तरी कर्मचाऱ्यांना वापर करण्यासाठी कुलुपाची चावी उघडी असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.याबाबत म्हसळा नायब तहसीलदार गणेश तेलंगे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की स्वच्छता गृह हे आमचे अखत्यारीत येत नाही ते म्हसळा नगरपंचायत हद्दीत येत असल्याने त्याची स्वच्छता राखण्यासाठी नगरपंचायतीने उपाययोजना केली पाहिजे. मागील काही दिवसांपूर्वी म्हसळा नगरपंचायत प्रशासनाला याबाबत लेखी कळविले आहे. दुसरे म्हणजे या परिसरात असलेले व्यापारी वर्ग, त्याचबरोबर परिसरात बाहेरून वास्तव्यास आलेले नागरिक हे या स्वछता गृहाचा मोठया प्रमाणात वापर करीत असून ते लोक स्वच्छता गृहात खूप घाण करून ठेवतात त्यामुळे स्वच्छता गृह अस्वछ असतो. या सर्व कारणांमुळे स्वच्छता गृहाला टाळे लावण्यात आले आहे.तहसील कार्यालय प्रशासन व नगरपंचायत प्रशासन या स्वच्छता गृहाची जबाबदारी एकमेकांचे खांद्यावर ढकलत असल्याने या सर्व गोंधळलेल्या परिस्थितीने तहसील कार्यालय येथे असलेले स्वछता गृह नेमके कोणाचे मालकीचे आहे हा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.स्वछता गृहाला टाळे लावण्याचा निर्णय या अगोदर कधी घेतला नाही मग नेमके आताच का टाळे लावण्यात आले आहे. तालुक्याचे तहसीलदार यांनी स्वछता गृह हे निदान कार्यालयीन वेळेत तरी सुरू ठेवावे आणि कार्यालयीन वेळ संपल्यानंतर स्वच्छता गृहाला टाळे लावण्याची कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
# म्हसळा तहसील कार्यालय परिसरात असलेल्या स्वच्छता गृहाचा मुद्दा अनेक वेळा चर्चेत आलेला असून आजपर्यंत कोणत्याही तहसीलदारांनी यावर ठोस उपाययोजना केलेली नाही. सदर स्वछता गृह याठिकाणी दैनंदिन शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या दृष्टीने खूप गरजेचे आहे. स्वछता गृहाला टाळे लावणे हा मार्ग नसून यावर उपाय शोधणे महत्त्वाचे आहे. नगरपंचायत व तहसील कार्यालय यांनी या स्वच्छता गृहाचा विषय एकमेकांवर न ढकलता एकत्र बसून तालुक्याचे आजी-माजी लोकप्रतिनिधी यांना सोबत घेऊन यातून मार्ग काढला पाहिजे जेणेकरून येथे येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.”
महादेव पाटील
माजी सभापती – पंचायत समिती म्हसळा