
दैनिक चालु वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : पतीच्या निधनानंतर महिलेला ‘विधवा’ असं संबोधलं जातं. हा शब्द चुकीचा असून तो मनाला खटकणारा असल्यानं ‘विधवा’ या शब्दाऐवजी ‘पूर्णांगी’ हा शब्द वापरला जावा, अशी मागणी महिला आयोग राज्य सरकारकडे करणार आहे, अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी हे सांगितलंय. महिला दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील दिशा सोशल फाउंडेशन द्वारा आयोजित कार्यक्रमात सौ. चाकणकर यांनी हा मुद्दा मांडला. महिलांना योग्य स्थान मिळावं, त्यांना समाजात मान सन्मानानं वावरता यावं, यासाठी त्यांनी ही मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
राज्यात सत्तांतर होऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-भाजपाचं सरकार सत्तेवर असून चाकणकर ह्या मविआ आघाडीतील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पदाधिकारी आहेत. उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांची या पदावर वर्णी लागली असून त्यांनी केलेली ही मागणी युतीचं हे सरकार मान्य करील का नाही, हा संशोधनाचा विषय असल्याचं कोणीही म्हणू शकेल. तथापि चाकणकर यांनी केलेली ही मागणी विधायक स्वरुपाची आहे. विधवा हा अपमानास्पद असा शब्द वाटत असून कमीपणा वाटणाऱ्या त्या शब्दाला कायमची तिलांजली देत ‘पूर्णांगी’ म्हणून संबोधले गेल्यास त्या महिलेला समाजात चांगला मान सन्मान मिळू शकेल असे चाकणकर यांना वाटते स्वाभाविक आहे.
हा शब्द अनेकदा उच्चारायला लागतो परंतु तो शब्द मला नकोसा वाटतोय. किंबहुना त्यासाठीच हा शब्द राज्य महिला आयोगाकडून काढून टाकावा आणि ‘पूर्णांगी’ हा शब्द द्यावा, अशी मागणी राज्य सरकारकडे केली जाणार आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने महिलांचा सन्मान होईल सं रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
दिशा सोशल फाउंडेशच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त चारचौघी या नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आणि विविध क्षेत्रांतील महिलांचा सत्कार आयोजित करण्यात आला त्यावेळी चाकणकर यांनी सगळ्यांशी संवाद साधला.
रुपाली चाकणकर पुढे असंही म्हणाल्या की, १७५ वर्षांपूर्वी ज्योतिबांच्या सावित्रीने स्त्री शिक्षणाचा पाया रचला. दुर्दैवाने सावित्रीमाई आम्हाला कितपत समजल्या, हा प्रश्न आहे. अनेक कर्तृत्ववान स्त्रियांनी योगदान दिले. लढा दिला मात्र महाराष्ट्र बदलला नाही. आमची वेशभूषा बदलली, घरे, गाड्या, रस्ते, रामाणी बदलली परंतु आमच्यातील माणूस बदलला नाही, ही खरी शोकांतिका आहे. स्त्रियांचे प्रश्न वर्षानुवर्षे कायम आहेत. समाज कितीही पुढारलेला वाटत असला तरी स्त्रियांचे मूळ प्रश्न कायम आहेत. महिलांना पुरुषांमुळेच त्रास होतो असे नाही तर महिलाच महिलांना त्रास देण्याचे प्रमाण वाढले आहे. असेही चाकणकर म्हणाल्या. एकूणच जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर चाकणकर यांनी घेतलेला हा निर्णय एकेकाळी लग्न समारंभ असो वा गोदभराई, लहान मुलांचे बारसे असो वा एखादे मांगलिक कार्य, अशावेळी चक्क कोणाड्यात टाकले जाणाऱ्या याच विधवा महिलांना ‘पूर्णांगी’ म्हणून संबोधले गेल्यास नक्कीच मान सन्मान मिळू शकेल. किंबहुना त्यासाठीच चाकणकर यांनी घेतलेला हा निर्णय निश्चितच राज्य सरकार मग ते कोणत्याही पक्षाचे असो, त्याला संवैधानिक मान्यता द्यायला मुळीच हरकत नसावी असे म्हटले तर चुकीचे ठरु नये.