
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनीधी -समीर मुल्ला
मुंबई तक डिजिटल चॅनेलचे मुस्तान मिर्झा यांना राज्यस्तरीय युवा पुरस्कार जाहीर. यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबईच्या वतीने दरवर्षी यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पत्रकारिता युवा पुरस्कार दिला जातो. यंदा तो धाराशिवचे मुस्तान मिर्झा यांना दिला जाणार आहे. या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जयंती दिनी रविवार दिनांक १२ मार्च २०२३ रोजी सकाळी ११ वाजता रंगस्वर सभागृह, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे कार्याध्यक्ष खा.सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. सर्व पुरस्कारांचे स्वरूप रुपये एकवीस हजार आणि सन्मानचिन्ह असे असणार आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दरवर्षी ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय युवा पुरस्कार’ दिला जातो. या पुरस्कार विजेत्यांची यादी चव्हाण सेंटरच्या युवा विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. चव्हाण सेंटरच्या माध्यमातून सातत्याने तरुणांसाठी प्रोत्साहनपर विविध कार्यक्रम घेतले जातात. त्याचाच एक भाग म्हणून सामाजिक, क्रीडा, उद्योजकता, रंगमंचीय कलाविष्कार, साहित्य, पत्रकारिता आणि इनोव्हेशन क्षेत्रांतील विविध गुणवंत युवकांना या पुरस्काराने दरवर्षी सन्मानित करण्यात येते.
पत्रकारिता युवा पुरस्कारात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मुस्तान मिर्झा (धाराशिव) यांची निवड करण्यात आली आहे. राज्यभरातून या पुरस्कारासाठी अर्ज मागवण्यात आले होते. गेल्या काही वर्षांपासून मुस्तान मिर्झा यांनी एबीपी माझा, झी24 तास, ईटीव्ही या वृत्तवाहिनीच्या काम करत असताना विविध विषय हाताळले आहेत. सध्या ते इंडिया टुडे ब्रँडच्या मुंबई तक या डिजिटल चॅनेलमध्ये काम करत आहेत.
आतापर्यंत त्यांनी ग्रामीण भागातील समस्या, दुष्काळी भाग, गारपिटी, अतिवृष्टी, पिकांचं नुकसान, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतीविषयक सकारत्मक बातम्या हे विषय हाताळले. रात्रीच्या लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दाखवण्यासाठी रात्रीच्या 12 वाजता थेट बांधावर जाऊन समस्या दाखवल्या. कोरोना काळात ग्राउंड रिपोर्ट, मजुरांचे, रुग्णांचे, सामान्य नागरिकांचे हाल कसे बेहाल आहेत, यावर भर दिले. सध्या मुंबईसह महाराष्ट्रातील विविध विषय हाताळत आहेत.