
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
मुंबई : काँग्रसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी केंब्रिजमध्ये केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक विशिष्ट अजेंडा चालवत आहेत आणि त्याकडे देशाला घेऊन जात आहेत असा आरोप केला होता. यावरून भाजपने राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. यातच आता देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री कर्ण सिंह मुंडक यांच्या उपनिषदावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन केले. त्या कार्यक्रमात राहुल गांधी यांचे नाव न घेता उपराष्ट्रपतींनी टीका केली. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती म्हणाले की भारताच्या लोकसभेत माईक बंद केला जातो हे इथल्या खासदारने विदेशात जाऊन म्हणणे हा देशाचा अपमान आहे, असेही उपराष्ट्रपती धनखड यांनी म्हटले आहे.
परदेशात जाऊन आपल्या देशावर टीका करणे हे साफ चुकीचे आहे. तसेच भारताच्या संसदेत माईक बंद केला जातो हे राहुल गांधी यांचे म्हणणे गैर आहे. भारताकडे G20 चे अध्यक्षपद आहे. भारतासाठी हा गौरवशाली क्षण आहे. अशावेळी एक खासदार परदेशात जाऊन भारतावर टीका करत असेल, देशाचा अपमान करत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही. सध्या आपला देश अमृत काळात आहे. सगळे भारतीय आनंदात आहेत. आपण अशा काळात असताना देशातील खासदार देशाच्या विरोधात बोलतो तेही बाहेरच्या देशात जाऊन. हे कितीतरी दुःखद आणि दुर्दैवी आहे. समृद्ध लोकशाही मूल्यांचे हे हनन आहे, असे उपराष्ट्रपती म्हणाले. उपराष्ट्रपतींनी राहुल गांधींचे नाव घेतले नाही मात्र त्यांचा रोख राहुल गांधींकडेच होता, असे सांगितले जात आहे.