
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर:मी जेलयात्री सुद्धा आहे, माझ्यासोबत ही एक डिग्री देखील चिटकली आहे, असं वक्तव्य माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केलं. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेडमध्ये छगन भुजबळ यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली त्यावेळी भुजबळ बोलत होते. ज्या वेळेस अडीच वर्ष जेलमध्ये राहावं लागतं, त्या वेळेस जेल म्हणजे काय असते? हे कळतं. त्या काळात मला वर्तमानपत्र आणि पुस्तकांची साथ मिळाली, असे भुजबळ म्हणाले.मंडळ आयोगाच्या विरोधात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका असल्याने शिवसेना सोडावी लागली, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. भुजबळ यांच्या नाशिक येथील फार्म हाऊसवर असताना बाळासाहेब ठाकरे यांनी पोटाला जात नसते म्हणत मंडळ आयोगाला विरोध केला होता. त्याच दिवशी नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात मंडळ आयोग नेमण्याच्या मागणीसाठी व्हीजेएनटीचा मोर्चा काढण्यात आला होता. ह्या दोन्ही बातम्या वर्तमान पत्रात आल्या. त्यानंतर शिवसेना सोडण्याचा निर्णय घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे भुजबळ म्हणाले. ते नांदेडमध्ये बोलत होते.
सर्वस्व गेल्यानंतरही उद्धव ठाकरे धैर्याने उभे : भुजबळ
पक्षाचे नाव गेले, चिन्ह गेले तरी उद्धव ठाकरे धैर्याने उभे आहेत. त्यांचे कौतुक केले पाहिजे, अशा शब्दात माजी मंत्री छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरेंची स्तुती केली. सर्वस्व गमावल्यानंतर एखादा व्यक्ती अंथरुणाला खिळला असता पण उद्धव ठाकरे हजारोंच्या गर्दी समोर बोललात ही सोपी गोष्ट नाही, असेही भुजबळ म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांना नेहमी विरोधी पक्षनेते म्हणून बघायला आवडेल : भुजबळ
देवेंद्र फडणवीस यांना नेहमी विरोधी पक्षनेते म्हणून बघायला आवडेल ते विरोधी पक्षनेता म्हणून चांगले काम करतात, अशी प्रयक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल की विरोधी पक्षनेता म्हणून असा प्रश्न भुजबळ यांना मुलाखती दरम्यान विचारण्यात आला होता. त्यावर भुजबळ यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.