
दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी- दीपक कटकोजवार
उत्तर प्रदेशच्या प्रभु श्रीराम जन्मभूमी अयोध्येतील मंदिराच्या उभारणीत वापरण्यात येणारे सागवान लाकूड महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातुन पाठवले जाणार आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री व चंद्रपूर, गोंदिया जिल्हा पालकमंत्री नामदार श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून मोठ्या थाटामाटात, भव्य काष्ठपुजन करून आणि रॅलीच्या माध्यमातून लाकडे पाठवण्यात येणार आहे. यासाठी रामायणातील काही पात्र आणि संगीत क्षेत्रातील कलावंत, उत्तर प्रदेश सरकारचे मंत्री आणि मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. अयोध्या येथील राम मंदिरासाठी १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातून पाठविण्यात येणार आहे. २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेत उत्तर प्रदेश सरकार मधील तीन कॅबिनेट मंत्री तथा अयोध्या राम मंदिरातील पुजारी सहभागी होणार असल्याचे कार्यक्रमाच्या आयोजन समितीच्या खास सुत्रांकडून कळते.
२९ मार्च रोजी होणाऱ्या काष्ठपुजन शोभायात्रा नियोजन संदर्भात रामबाग (चंद्रपूर) येथे नुकतीच बैठक संपन्न झाल्यानंतर लगेच बल्लारपूर येथील पदाधिकाऱ्यांसह स्थानिक शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात प्रभू श्रीराममंदिर अयोध्या काष्ठ पूजन समितीची बैठक संपन्न झाली. 29 किंवा 30 मार्च रोजी भव्य पूजन कार्यक्रम होणार असुन राम मंदिराच्या उभारणीत चंद्रपूरच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीत रामभक्तांनी प्रचंड संख्येने सहभागी व्हावे व असे आवाहन चंद्रपुर जिल्हा पालकमंत्री तथा महाराष्ट्राचे वने, मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी यांनी केले
पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या कल्पकतेतुन दिल्ली येथे साकारत असलेल्या सेंट्रल व्हिस्टा पाठोपाठ अयोध्येतील राम मंदिरासाठी चंद्रपूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात उच्च प्रतिचे सागवान लाकूड पुरवठा करण्यात येणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील मौलिक प्रसिद्ध सागवान लाकूड देशातील अनेक आकर्षक व देखण्या इमारतींमध्ये देखील वापरले जात असल्याने आपल्या जिल्हयाकरिता अभिमानाची व गौरविस्पद बाब आहे. या कार्यक्रमाबद्दल रामभक्तांमध्ये जबरदस्त उत्साह दिसून येत आहे.