
दैनिक चालु वार्ता वाशीम प्रतिनीधी- वसंत खडसे
वाशिम : जिल्ह्यात वाशिमसह, मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरूळपीर आणि मानोरा या सहा बाजार समितीत्यांची निवडणूक होत आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारी रिसोड बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यातील प्रतिष्ठित नेत्यांचा कस लावणारी ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एक छत्री अंमल असणाऱ्या रिसोड बाजार समितीची निवडणूक गटातटाच्या राजकारणामुळे आणि भ्रष्टाचारात गुंतलेल्या अनेक जुन्या चेहऱ्यांना परत संधी दिल्यामुळे एक हाती सहज सत्ता काबीज करणाऱ्या प्रस्थापित गटाला या निवडणुकीत मात्र, प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही बाजार समितीवर, कब्जा मिळवणे कठीण झाले असल्याचे अनेक मतदारांच्या प्रतिक्रिया वरून प्रकर्षाने जाणवत आहे. परिणामी नेत्यांची एकी तर कार्यकर्त्यांमध्ये बेकी असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे.
काल दिनांक २० एप्रिल रोजी रिसोड बाजार समितीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कायम असलेले अर्जदार उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत. भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी तुल्यबळ लढत होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. परिणामी राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून, त्या अनुषंगाने ठिकठिकाणी चर्चांचे फड सुद्धा रंगत आहेत. प्रत्यक्ष मतदानाचा हक्क बजावणारे मतदार व सामान्य नागरिक यांच्या चर्चेवरून जुन्या चेहऱ्यांना व भ्रष्टाचारात गुंतलेल्यांना परत संधी दिल्यामुळे अनेक नेत्यांचे कट्टर समर्थक असलेले कार्यकर्ते नाराजी व्यक्त करतांना दिसत आहेत. तथापि मतदार नवीन चेहऱ्याच्या उमेदवारांना पसंती देणार असल्याचे बोलत आहेत. बहुतेक सर्वच उमेदवारांचा प्रचाराचा नारळ अक्षय तृतीयाचे औचित्य साधून फुटणार असल्याचे माहिती पडले आहे. अटीतटीच्या व गुंतागुंतीच्या निवडणुकीत बाजार समितीच्या सत्तेची चाबी यावेळेस कोणाच्या हातात द्यायची हे मतदानाच्या दिवशी 30 एप्रिल रोजी सुज्ञ मतदार ठरवणार आहे.
” निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या व भ्रष्टाचारात गुरफटलेल्यांना पुन्हा, पुन्हा संधी दिल्यामुळे जाहीर नाराजी आहे. शिवाय मतदार हे बहुतांश शेतकरी असल्याकारणाने, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचा अजेंडा घेऊन व बाजार समितीचा पारदर्शक कारभार देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकस आघाडीच्या उमेदवारांनाच मतदान करणार..!
___
नारायण धनीराम बाजड
( मतदार, नेतंसा ता. रिसोड )