
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी:-सौरभ कामडी
मोखाडा : भात, नागली, वरई उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या मोखाडा तालुक्याच्या ग्रामीण भागांत बळीराजाची पेरणीपूर्व राब भाजणीची कामे अंतिम टप्प्यात आली असून भात शेतीच्या तुटलेल्या बांध बंधिस्तीची कामे देखील सुरु असल्याचे चित्र दिसून येत आहे.भात, नागली व वरईचे बियाणे पेरणी करण्यापुर्वी शेतातील एका कोपऱ्यात पालापाचोळा, गोवऱ्या, खत, झाडांच्या बारीक फांद्या पसरवून पेटवून दिले जाते.त्यामुळे जमिनीत असलेले गवताचे बियाणे जळून जाऊन जमिन भूस भूसीत होत असते.त्यानंतर पावसाळा सुरु होण्याचे संकेत मिळाले की राब तयार केलेल्या ठिकाणी भात, नागली व वरई पिकांच्या बियाणांची पेरणी केली जाते.
शेतकऱ्यांचा खरीप हंगाम जरी जूनमध्ये सुरू होत असला तरीही त्याची पूर्वतयारी मात्र मे महिन्यापासूनच सुरू करण्यात येते.सध्या सर्वत्र वातावरणात बदल होत आहेत.त्यातच बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रवादळामुळे राज्यात अधुनमधून अवकाळी पाऊस पडत आहे.त्यामुळे आता अवकाळी पावसाच्या रुपाने हजेरी लावणारा पाऊस जुलै, ऑगस्ट महिन्यात दांडी मारतो की काय अशी भिती सुध्दा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.कारण जुलै महिन्यापासून शेतकरी शेतात तयार झालेल्या पिकांची लागवड करत असतो यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजनही बिघडण्याची भीती त्यांना आहे.सध्या शेतीच्या कामांना ग्रामीण भागात वेग आला असुन शेतकरी कुटुंबाने काडीकचरा वेचून बांधावरील झाडेझुडपे साफ करणे, आवणांचे तुटलेले बांध बंधिस्तीची दुरुस्ती करणे आदी कामे सुरू केली आहेत.ग्रामीण भागात जरी शेतकऱ्यांने आधुनिकतेची कास धरली असली तरी देखील शेतीच्या कामासाठी बैलजोडी ची गरज भासते त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे बैलजोडी नाही असे शेतकरी बैलजोडी खरेदी करण्यासाठी कधी गाव पाड्यांना तर कधी घोटी येथील बैल बाजारात हेलपाटे मारत आहेत
तर जांभूळ, आंबे या फळांचे पीकही उशिराने बाजारात दाखल होत आहेत.अशातच पाऊस सुरू झाला तर नुकसानीला सामोरे जावे लागणार असून आर्थिक नियोजन बिघडेल अशी चिंता शेतकऱ्यांना आहे.साधारण जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात शेतकरी राब करणे, मशागत करणे, बांधबंदिस्ती करणे, लाकूड फाटा गोळा करणे इत्यादी पावसाळा सुरु होण्यापूर्वी ची तयारी करत असतो..
————————————————————-
पर्यावरण संरक्षणाचा संदेश :-
आदिवासी भागात शेतकऱ्यांना राब भाजणीसाठी झाडांच्या फांद्याची गरज भासते.मात्र अशा कामासाठी येथील शेतकरी झाडे न तोडता उंच वाढलेल्या मोठ्या झाडांच्या निरुपयोगी फांद्या तोडतात त्याच सोबत गवत, खत व इतर सुका पालापाचोळा एकत्र करून जाळतात यात कोणत्याही प्रकारचे प्लॅस्टिक किंवा हानिकारक ज्वलनशील पदार्थ नसतो.त्यामुळे पर्यावरण संरक्षण तर केले जातेच शिवाय जमिनीचा पोतही सुधारण्यासाठी मदत होते..
————————-————————————
“ यावर्षी पाऊस लवकरच पडण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे पावसाला सुरूवात होण्यापूर्वीच भात, नागली, वरई पिकासाठी राब भाजणीची शेतीची कामे संपायला घेतली आहेत तर पाऊस पडायच्या आधी पावसाळ्यात लागणारा फोडून ठेवलेला लाकूड फाटा, गुरांसाठी ठेवलेले पैढा, वैरण पाऊस पडण्याच्या आधी घरात साठवायला सुरुवात केली आहे..”
– जगन जाधव.. शेतकरी मोखाडा.