
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम जिल्हा- वसंत खडसे
वाशिम : रिसोड तालुक्यातील वाडीवाकद येथील पोटाच्या मुलाने पैशाच्या हव्यासापोटी जन्मदात्या बापाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. वारंवार पैशाची मागणी करूनही वडील पैसे देत नसल्याचा राग मनात धरून आरोपी मुलाने आपल्या जन्मदात्या बापाचा धारदार शस्त्राने खून केला. बापलेकाच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार, पैसे न दिल्याने संतापलेल्या मुलाने आपल्या ७० वर्षीय जन्मदात्या बापाचा धारदार शस्त्राने वार करून खून केला. सदर घटना रिसोड तालुक्यातील पिंपरखेड नजीकच्या भगवान बाबा संस्थान येथे उघडकीस आली. निर्दयी आरोपी मुलाचे नाव संजय आत्माराम मुंढे असून मृतक वडीलाचे नाव आत्माराम धोंडू मुंढे आहे. याबाबत मृतकाचा भाऊ रामकिसन मुंढे यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्याचा भाऊ आत्माराम हा गेल्या १० वर्षापासून रिसोड तालुक्यातील पिंपरखेड, वाडीवाकद, वाकद, बोरखेडी या चौफुलीवर असलेल्या भगवान बाबा संस्थान मध्ये पूजाआर्चा करत होता. मृतकाचा मुलगा संजय मुंढे हा आपल्या वडिलाकडे पैशाची मागणी करत होता. पैशाची मागणी पुरी न केल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. याच कारणावरून १५ मे रोजी पिता-पुत्रांमध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. मात्र मृताच्या बहिणीने संजयची समजूत घालून वाद मिटवला व त्याला तेथून काढून दिले होते. परंतु पैसे न दिल्याचा राग मनात धरून संजयने १५ मेच्या रात्री धारदार शस्त्राने वडिलांची निर्दयपणे हत्या केली. सदर फिर्यादीवरून रिसोड पोलिसांनी कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी संजय मुंढे याला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.