
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जि.प अध्यक्षांची उपस्थिती
जव्हार: ग्रामीण आदिवासी भागात अनेक पारंपारिक चालीरीती आजही धावपळीच्या युगात टिकून असल्याच्या आपल्याला पहावयाला मिळतात.ग्रामीण पाड्यात गाव म्हटलं की त्या गावचा एक प्रमुख आणि त्याच्यासोबत त्याचा एक साथीदार म्हणजेच गावचा काठ्या.या काठ्याचा गाव चालवण्यात महत्त्वाचा वाटा आहे.गावात कोणतीही शुभ-अशुभ,अपरिचित घटना घडली की हा काठ्या गावात गल्ली-गल्लीत दवंडी पिटवून माहिती जनतेला माहिती देत होता.या काठ्यावर आधारित आता लवकरच लघुचित्रपट येणार असून गावचा काठ्या पडद्यावर झळकणार आहे.काठ्या लघुचित्रपटाचे चित्रीकरण तालुक्यातील हिरडपाडा येथे पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश निकम यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून लघुचित्रपटाच्या चित्रीकरणाला आता लवकरच सुरुवात होणार आहे.लोकप्रिय आदिवासी अभिनेता यशवंत तेलम हे काठ्याची भूमिका साकारणार असून या लघुचित्रपटाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृती मांडली जाणार आहे.
खेड्यातील या काठ्याचे महत्व आणि गावातील जनता कशी एक संगतीने आनंदाने जीवन जगत असायची हे प्रेक्षकांना पडद्याच्या रूपाने अनुभवायला मिळणार आहे.या लघुचित्रपटाचे चित्रीकरणाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुरेखाताई थेतले,जव्हार पंचायत समितीचे माजी उपसभापती चंद्रकांत रंधा,शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राऊत,जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ईश्वर पवार, उपकार्यकारी बांधकाम अधिकारी विष्णू बोरसे,जनजाती विकास मंचाचे पालघर जिल्हाध्यक्ष नरेश मराड, हिरडपाडा ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच भारती भोरे व काठ्या या लघुचित्रपटात काम करणारे सहकलाकार यांची उपस्थिती होती.विशेष म्हणजे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम व त्यांच्या पत्नी जि.प पालघरच्या सदस्या सारिका निकम यांच्या वाढदिवशीच या लघुचित्रपटाचे उद्घाटन असल्याने उद्घाटन सोहळा दिमाखात पार पडला.या वेळी बोलतांना निकम यांनी आर्थिक किंवा अन्य कारणामुळे आदिवासी कलाकार मागे पडत असून या कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असून काठ्या लघुचित्रपटाला ५१ हजार रुपयाची मदती देणार असल्याची त्यांनी यावेळी जा7हीर केले.