
दैनिक चालु वार्ता देवणी तालुका प्रतिनिधी-नय्युम खाजामिय्याॅ शेख
________________________________
देवणी:- तालुक्यातील वलांडी येथे मुलीची छेडछाड प्रकरणी जाब विचारणाऱ्या मुलीसह आई – वडीलांवर प्राणघातक हल्ला; या हल्ल्यात मुलीचे वडील गंभीर जखमी, या प्रकरणी शुक्रवार दि.२६ मे रोजी पहाटे देवणी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत देवणी पोलीसांच्या वतीने मिळालेली अधिक माहिती अशी की, वलांडी येथील फिर्यादीचे घरासमोरील अल्ताफ समद शेख याने दि.२५ मे रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीची मुलगी व सासू घरी असताना फिर्यादीच्या मुलीस वाईट हेतूने छेडण्याचा प्रयत्न केला. अशी माहिती मुलीने घोडवाडी येथून देवदर्शनावरुन परत आलेल्या आलेल्या आई – वडीलांना सायंकाळी दिली. या प्रकरणी जाब विचारणाऱ्या मुलीच्या आई – वडीलांसह मुलीवर अल्ताफ शेख व त्याच्या कुटुंबीयांनी लोखंडी राॅड व काठी हातात घेऊन प्राणघातक हल्ला चढवला. यात मुलीसह त्याच्या आई – वडिलांना राॅडने व काठीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात मुलीच्या वडीलांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना वलांडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून उदगीर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना तातडीने रात्रीच लातूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५८/२०२३ कलम ३५४, ४५२, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४३, १४७, १४९, भादवी व महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ नुसार अल्ताफ समद शेख, शेख समद रुक्मोद्दीन, अफताब समद शेख, जन्नत समद शेख, तब्बू समद शेख सर्व रा. वलांडी व हमजा शेख रा. जवळगा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे हे करीत आहेत.