
दैनिक चालु वार्ता उपसंपादक वाशिम -वसंत खडसे
वाशिम : विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्या संदर्भात मुंबई येथील आझाद मैदानावर दिनांक १५ मे पासून बेमुदत आंदोलन सुरू होते. सदर आंदोलनास देशातील अनेक कृषी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता शिवाय विदर्भासह, राज्यातील अनेक आमदार, खासदार व काँग्रेसच्या नेत्यांनी आंदोलनास भेट देऊन प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यासंदर्भात शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे कबूल केले होते. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सकारात्मक आश्वासनानंतर अकराव्या दिवशी बेमुदत आंदोलन मागे घेण्यात आल्याची माहिती प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष श्री माणिकराव गंगावणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली आहे.
सन २००६ ते २०१३ च्या दरम्यान ज्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी शासनाने अत्यल्प दरात सरळ खरेदी पद्धतीने अधिग्रहित केल्या होत्या, अशा अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना सन २०१३ च्या कायद्यानुसार वाढीव मोबदला देण्यात यावा तसेच प्रकल्पग्रस्तांसाठी असलेले तुटपुंजे,नगण्य ५% आरक्षणात वृद्धी करून ते किमान १५% करण्यात यावे. पुनर्वसन कायद्यातील तरतुदीनुसार विस्थापित कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय, निमशासकीय नोकरीत सामावून घ्यावे. अथवा, प्रकल्पग्रस्तास एकर कमी २० लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे. आदी, मागण्याकरिता विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समितीने मुंबई येथील आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन पुकारले होते. सदर आंदोलनास मा.आ. श्रीकांत देशपांडे, मुंबई शहर काँग्रेसचे अध्यक्ष तथा आ. भाई जगताप, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते मा. अंबादास दानवे, वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा रिसोड~ मालेगाव मतदार संघाचे आ. अमित झनक, चांदुर रेल्वे मतदार संघाचे आ. प्रकाश आडसड व खा. भावनाताई गवळी यांचे खाजगी सचिव अजय गिलचे आदींनी, भेट देऊन आंदोलकांशी मागण्या संदर्भात सविस्तर चर्चा केली होती. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जनसंपदा विभागातीचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी आंदोलन मागे घेण्याचे सुचित करून, आपण मागण्या संदर्भात उपमुख्यमंत्री कथा जलसंपदा मंत्री यांच्याशी चर्चा करण्याचे आश्वासन दिले होते तथापि आंदोलकांचे समाधान न झाल्यामुळे आंदोलन सुरूच होते. दि. २४ मे रोजी अमरावती विभागाचे जलसंपदा मुख्य अभियंता अभय पाठक यांनी सुद्धा शासनाच्या वतीने भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्या मार्गी लावण्या संदर्भात पत्र दिले, सदर पत्र उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवांनी शिफारस घेऊन मुदत व पुनर्वसन विभागात तात्काळ कार्यवाहीस पाठविले. त्यामुळे समितीचे शिष्टमंडळ अध्यक्ष मनोज तायडे, कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे, बाबुसिंग पवार, हरिश्चंद्र जाधव, सौ. वनिता गंगावणे, सौ. मनीषा चक्रनारायण आदींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेऊन सुरू असलेल्या आंदोलनाची व मागण्यांची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी तात्काळ दाखल घेऊन विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविण्यासाठी स्पेशल एक मंत्री नेमून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या तत्परतेने मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. परिणामी अवघ्या तीन तासातच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुनर्वसन व पर्यटन मंत्री मंगलदास लोढा तसेच जलसंपदाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर यांनी आझाद मैदानावर भाव घेऊन आंदोलकर्त्या सोबत सकारात्मक चर्चा केली व आश्वासन दिले. त्यामुळे बेमुदत सुरू असलेले आंदोलन मागे घेण्यात आल्याची अधिकृत माहिती संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे यांनी दिली आहे.
आंदोलन काळात आपापल्या मतदारसंघातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना रात्री वास्तव्यासाठी आमदार निवास उपलब्ध करून देणारे आ. राजेंद्र पाटणी, आ. अमित झनक, आ. किरणराव सरनाईक, आ. इंद्रनील नाईक, आ. निलय नाईक, आ. संतोष बांगर, आ. तानाजी मुटकुळे ,आ. प्रताप आडसड, आ. यशोमती ताई ठाकूर, आ. रवी राणा आ. श्वेताताई महाले, आ. नितीन देशमुख आदि, आमदार महोदय यांचे खूप मोठे सहकार्य लाभले तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाने तब्येतीत बिघाड झालेल्या आंदोलकांना औषधोपचारासाठी रुग्णालयात नेण्यासाठी तातडीने वाहन व्यवस्था करून दिल्याबद्दल उपरोक्त सर्वांचे समितीच्या वतीने समाधान व्यक्त केले असल्याचे गंगावणे यांनी म्हटले आहे. यावेळी विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती विदर्भ प्रदेशचे कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे यांच्यासह, जिल्हा समितीचे पदाधिकारी बाबू सिंग पवार, राधेश्याम शिरसाट, मुख्तार खान पटेल, संतोषराव भिसडे, देविदास गंगावणे, जयाजी भेडेकर, अशोकराव मगर, रवी पाटील रंजवे, जगदेवराव गहुले, पुंडलिक घुगे, पंढरी पाटील आदीसह मंगरूळपीर वाशिम तालुक्यातील शाखाप्रमुख उपस्थित होते.