
एका मातेकडुन एकाच वेळी चार मुलींना जन्म…
चारही मुलींचे वजन सरासरी १ किलो २०० ग्रॅम…
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती (धारणी) : मेळघाट क्षेत्र हा कुपोषण,माता व
बालमृत्यू करिता संपूर्ण भारत देशात काळी ओळख म्हणून
पटलेला आहे.मेळघाट हे संपूर्ण क्षेत्र धारणी आणि चिखलदरा तालुक्यात विभागलेला अतिदुर्गम क्षेत्र आहे.येथे जे घडते ते नवलंच असते.गरोदर मातांना कमी वजनाचे मूल झाल्याची प्रकरणे अधून-मधून समोर येत असतात.मात्र; बुधवारी सकाळी धारणी उपजिल्हा रुग्णालयाच्या इतिहासातील पहिली घटना म्हणजे एका गरोदर मातेनी तब्बल चार मुलींना एकाच वेळी जन्म दिल्यानंतर समोर आली असून मेळघाटातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्राप्त माहितीनुसार धारणी
तालुका अंतर्गत येणाऱ्या दूनी गावातील निवासी पपीता बलवंत उईके वय वर्षे २४ हिला तिच्या तिसऱ्या वेळेच्या प्रसुतीकरिता बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.ज्यामध्ये धारणी उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रीती शेंद्रे आणि डॉ.तेजस्वीनी गोरे अधिपरीचारीका यांनी पपीताची नॉरमल प्रसुती यशस्वीरित्या
पार पाडली.मात्र;प्रसुती दरम्यान स्त्रीरोग तज्ञ डॉ.प्रीती शेंद्रे यांना आश्चर्य झाले की,गरोदर पपीताने एका नंतर एक अशा तब्बल चार
मुलींना जन्म दिले.धारणी उपजिल्हा रुग्णालयातील ही पहिलीच घटना असून जन्म झालेल्या चारही मुलींचे सरासरी वजन १ किलो २०० ग्रॅम असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पपीता आणि जन्म झालेल्या चारही मुलींवर पुढील उपचार वैद्यकीय अधीक्षक डॉ.दयाराम जावरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ.प्रीती शेंद्रे,बालरोगतज्ञ डॉ.अश्विन पवार व इतर वैद्यकीय चमु करीत आहे.
जन्म झालेल्या चारही मुलींचे वजन कमी असल्यामुळे त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीयु मध्ये ठेवण्यात आले असून माता व जन्मलेल्या मुलींची परिस्थिती सामान्य असल्याबाबतची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.सदर मातेला व जन्मलेल्या चारही अपत्यांना बघण्याकरिता रुग्णालयात बघ्यांनी गर्दी केली आहे…