
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नादेड (देगलूर): तुम्ही व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्रविटर, इन्टाग्राम, टेलीग्राम, स्नॅप आदी सोशल मीडियावर असाल तर चांगलेच आहे पण सोशल मीडियाचा वापर करताना जरा जपूनच वापर करा. तुम्हाला त्यासाठी खूप काळजी घ्यावी लागणार आहे.कारण दिवसेंदिवस सोशल मीडियाद्वारे फसवणुक होण्याचे आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. वाढत्या सायबर क्राईमला आळा घालण्यासाठी पोलिस विभागाने देखील स्वतंत्र सायबर क्राईम विभाग सुरू केला असून त्या ठिकाणीही तक्रारींची संख्या वाढत आहे.गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे त्यातून फसवणुकीचे प्रमाणही वाढत चालले आहे. सोशल मीडियामध्ये गैरप्रकार घडण्याचे प्रमाणही मोठे आहे. तसेच आनलाइन फसवणुकीच्याही घटना वाढीस लागल्या आहेत.यामध्ये युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वयोगटातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यामुळे गैरप्रकार किंवा फसवणुकीच्या घटना टाळायच्या असतील तर सोशल मीडियाचा वापरही अत्यंत काळजीपूर्वक करणे आवश्यक असल्याचे मत नांदेडच्या सायबर क्राईम पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गंगाप्रसाद दळवी यांनी व्यक्त केले आहे.
सोशल मीडियाबाबत जनजागृती करण्यासाठी सातत्याने शाळा, महाविद्यालयासह इतर महत्वाच्या ठिकाणी विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली.सोशल मीडियासंदर्भात दाखल गुन्हे
नांदेडला पोलिस अधीक्षक कार्यालयात २०१७ पासून स्वतंत्र सायबर क्राईम विभाग सुरू करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार आणि गृह विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग कार्यरत आहे. तसेच फेसबुकवर नांदेड पोलिस (Nanded Police) या नावाने अकाऊंट उघडण्यात आले असून त्यामध्ये जनजागृतीसाठी माहिती देण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी फॉलो किंवा लाईकही करू शकता.सोशल मीडियावर अशी घ्या काळजी…..
अकाऊंट ओपन केल्यानंतर प्रोफाईल लॉक करावेत अन्यथा दुसरे कुणी तुमच्यासारखे हुबेहुब खोटे अकाऊंट काढू शकतात.
टू स्टेप व्हेरीफिकेशन करावे जेणे करून अकाऊंट हॅक होणार नाही.
पासवर्ड मजबूत ठेवावा (मोबाईल, जन्मतारिख, गाडी क्रमांक असे सोपे नकोत)
अनोळखी व्यक्तीशी मैत्री किंवा चॅटिंग करू नये,
गेम खेळू नये. तसेच फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये.
अनोळखी व्यक्तीचा व्हिडिओ कॉल घेऊ अथवा करू नका.
अनोळखी व्यक्तीचा मोबाईल क्रमांक सेव्ह करू
नका.
अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकला क्लिक किंवा फॉलो करू नका तसेच त्यात माहिती भरू नका.सोशल मीडियावर एकापेक्षा जास्त अकाऊंट उघडू नयेत. उघडले असतील तर बंद करा.
अनोळखी व्यक्तीला आपली व्यक्तीगत आणि गोपनीय माहिती (पासवर्ड, बँक, आधार, पॅन कार्ड वगैरे ) देऊ नका
अनोळखी व्यक्तीने पाठविलेल्या लिंकद्वारे कोणतेही अॅप्लीकेशन (एपीके फाईल) इन्स्ट्रॉल करू नका.
आपले महत्वाचे आणि प्रायव्हेट फोटो, माहिती
शेअर करू नका.
आवश्यक असेल तरच सोशल मीडियाचे अॅप्लिकेशन आपल्याकडे ठेवावेत अन्यथा डिलीट करावेत. तसेच जेवढे आहेत तेवढे नेहमी अपटेड ठेवावेत.