
दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने (दि.२७) रविवार रोजी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील गावंडगाव या छोट्याश्या गावातील चर्मकार समाजातील होतकरू तसेच मजूर वर्गातील मुलगा तेजस देवेंद्र गव्हाळे यांची भारतीय सैन्याचा अविभाज्य भाग असणाऱ्या बीआरओ दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार माजी आमदार रमेश बुंदिले यांच्या हस्ते करण्यात आला.तेजस हा खुप मेहनती व कार्यक्षम मुलगा असून त्याने वेल्डिंगचे औद्योगिक प्रशिक्षण घेतले आहे आणि तो यापूर्वी वेल्डिंग या तांत्रिक क्षेत्रातील खाजगी दुकानामध्ये मजूर म्हणून कामाला होता.
बीआरओ म्हणजे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन.हे एक रोड कार्यकारी दल आहे आणि भारतीय सैन्याचा अविभाज्य भाग असून भारताच्या सीमावर्ती भागात आणि मैत्रीपूर्ण शेजारी देशांमधील रस्त्यांचे जाळे विकसित करणे आणि त्यांची देखभाल करणे ही त्याची भूमिका आहे.अश्या या महत्वाच्या तांत्रिक क्षेत्रात देशसेवेमध्ये तेजस कार्यरत असणार आहे असे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या पदाधिकारी यांनी यावेळी आपल्या शब्दातून व्यक्त केले.सत्काराप्रसंगी तेजस ने यशाचे संपूर्ण श्रेय आई सौ.उज्वला व वडील देवेंद्र यांना दिले.
या सत्कार सोहळ्या प्रसंगी माजी आ.रमेशजी बुंदीले त्यांच्या पत्नी सौ.मीनाताई बुंदीले,संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे विभागीय अधिकारी दिनेश भागवतकर,राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा जेष्ठ समाजसेवक शेषरावजी गव्हाळे,सरपंच ज्ञानदेवराव ढवळे,जिल्हाध्यक्ष प्रल्हाद आसोले तालुकाध्यक्ष डॉ.प्रमोद रेवसे,महिला तालुकाध्यक्ष शुभांगी चापके,अरुण हिरे,रवींद्र व्यवहारे,अमोल भोपळे आदि चर्मकार महासंघाचे पदाधिकारी व गावातील गुरुदास वानखडे,पंकज वानखडे गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.