
शेतकरी व तरुणांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…
दैनिक चालू वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड ( देगलूर) :-
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, वाढती महागाई व रोजगाराच्या अपुऱ्या संधी यामुळे शेतमजूर, कामगार व बेरोजगारांच्या वाढत्या समस्या, मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष या व इतर महत्त्वपूर्ण प्रश्नांबाबत जनजागरण, प्रबोधन करत करतच शेतकरी व कष्टकऱ्यांचे संघटन उभं करण्याच्या उद्देशाने शेतकरी नेते तथा विश्व परिवाराचे संस्थापक कैलास येसगे कावळगावकर यांच्या संकल्पनेतून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर निघणाऱ्या ‘किसान-कामगार संवाद’ यात्रेच्या पत्रकाचे विमोचन करडखेड येथील महादेव मंदिर व होट्टल येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात शेतकरी व तरुणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व अत्यंत उत्साहात करण्यात आले. त्याचबरोबर परिसरातील सर्व शेतकऱ्यांना पत्रकाचे वाटप करून संवाद साधण्यात आले.
या संवाद यात्रेत प्रामुख्याने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करून तात्काळ अनुदान वाटप करावे, तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शेतीसाठी 24 तास मोफत वीज देण्यात यावे, औरंगाबादचे निवृत्त विभागीय आयुक्त सुनीलजी केंद्रेकर यांनी महाराष्ट्र शासनाला केलेल्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, विशेषतः तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना पेरणीपूर्व एकरी दहा हजार रुपये अनुदान द्यावे, शेतकरी व शेतमजुरांचा ५ लाख रुपयांचा विमा संरक्षित करावा, वाढत्या महागाईनुसार अपंग, वृद्ध व निराधारांचे अनुदान 3000 रुपये करावे व राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करून घ्यावे या प्रमुख मागण्यांबाबत प्रबोधन करून शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.
म्हणून परिसरातील शेतकरी, शेतमजूर, निराधार व तरुणांनी या होऊ घातलेल्या किसान-कामगार संवाद यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन संयोजक कैलास येसगे कावळगावकर यांनी केले आहे.
यावेळी रमेश घुळेकर, शिवराज गोपछडे, शिवानंद स्वामी, संतोष मनधरणे, निखिल जाधव, शहाजी पा. बाबरे, माधव पंचडे, दिगंबर शिळवणे, मारुती कांबळे, विशाल जांभळीकर, संतोष शिवपुजे, दिगंबर घंटे, माधव लगडे, संग्राम येलबुगडे, नरेश राचलवार, शाहीर माणिक कोकले, बसवराज फुलारी, पांडुरंग पिटलेवाड, दिगंबर शिवपुजे, माजी सरपंच शेषराव सूर्यवंशी, प्रभू वंकलवार, गंगाधर वंकलवार, रवी ठाकूर वैजनाथ डांबरचेसह शेतकरी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.