
दैनिक चालू वार्ता
प्रतिनिधी मंठा/ सुरेश ज्ञा. दवणे
जालना (मंठा):शेतकऱ्यांच्या मागे लागलेली संकटाची मालिका कमी व्हायचे नाव घेत नाही, कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट हे तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेली आहे. आतापर्यंत पावसाने दिलेल्या खंडामुळे शेतकरी हवालदिल झाला होता आता बुरबुर पाऊस आल्याने पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे यामध्ये शेंगा भरण्याच्या अवस्थेत असलेल्या सोयाबीनवर तसेच कपाशीवर अळ्यांचा प्रकोप वाढला आहे हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतकरी फवारणीसाठी धावपळ करताना आज दिसून आला.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाला विलंब झाला आहे. त्यामुळे पेरणीलाही उशीर झाल्याने शेतकऱ्यांचे पेरणीचे नियोजन कोलमडले होते. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांनी पेरणी आटपून घेतली नंतर मात्र पावसाच्या
लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसला. ऑगस्टमध्ये तब्बल ३० दिवस पावसाचा खंड असल्याने सोयाबीन व कपाशीचे पीक सुकायला लागले होते.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळेल का नाही मात्र आता या पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या सोयाबीनचे पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु सोयाबीनवर अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. तर सतत पावसाचा लपंडाव सुरू असलेल्यामुळे कीटकनाशकाची फवारणी करताना अडथळा निर्माण झाला.
अनेक शेतकरी अळ्यांचा नायनाट करण्यासाठी मजुरांना मागील तितका रोज देऊन कीटकनाशकांच्या फवारण्या करीत आहेत. मात्र पाहिजे तसा परिणाम त्याचा दिसून येत नसल्याने बळीराजा हतबल झाला आहे
या प्रादुर्भावावर काय उपाय योजना…
कपाशी पिकावरील बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उपायोजना केल्या आहे यामध्ये काही शेतकऱ्यांनी फेरोमोन ट्रॅप लावने या ट्रॅपमध्ये बोंड अळीचे पतंग आढळून आले तर अशावेळी शेतकऱ्यांना कृषी विभागाचे मार्गदर्शन आवश्यक असते कारण गुलाबी बोंड अळीचे पतंग कसे ओळखावे त्यासाठी फेरोमोन ट्रॅपचा कसा वापर करावा. डोमकळ्या वेचने व नष्ट करणे, निंबोळी अर्काचा वापर करणे तसेच रासायनिक कीटकनाशकाचा वापर कसा करावा. याबाबत विशेष मार्गदर्शन शेतकऱ्यांना करण्याची गरज निर्माण झाली आहे.