प्रतिनिधी/ राखी मोरे
दै.चालु वार्ता/पुणे
पुण्यातील तळवडे येथील कारखान्यात झालेल्या दुर्घटनेतील भाजलेल्या महिलेसह आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या 11 झाली आहे.प्रियंका यादव (वय 32) आणि अपेक्षा तोरणे (वय 18), अशी मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.सर्व जखमींवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यातील प्रतीक्षा तोरणे (वय 16) आणि कविता राठोड (वय 45) यांचे 9 डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय 31) यांचे 10 डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे.
तर, उर्वरीत जखमींपैकी प्रियंका यादव यांचे गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजता तर, अपेक्षा तोरणे हिचे सकाळी साडेसहा वाजता निधन झाले आहे. तळवडे दुर्घटनेतील मृतांची संख्या अकरावर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, सुमन गोंधळे, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तळवडे येथील शिवराज एंटरप्रायजेस या कारखान्यामध्ये 8 डिसेंबर रोजी घडलेल्या स्फोट दुर्घटनेत सहा महिला कामगारांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता.
जखमी रुग्णांच्या उपचारासाठी आठ परिचारिका
तळवडे येथील स्पार्कल फायर कॅण्डल बनविणार्या कारखान्यास आग लागून झालेल्या दुर्घटनेतील जखमीवर पुण्यातील ससून सर्वोपचार रुग्णालय उपचार सुरू आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने जखमी रुग्णांसाठी वैद्यकीय पथकाची तसेच, सुश्रुषा करण्यासाठी स्टाफनर्सची नेमणूक करण्यात आलेली होती. गुरूवारी (दि.14) त्यामध्ये वाढ करण्यात येऊन यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेंद्र वाबळे यांनी आठ अतिरिक्त स्टाफनर्सची तात्पुरत्या स्वरूपात थेट ससून रुग्णालय येथील बर्निंग वार्डमध्ये नेमणूक केली आहे.
त्यामध्ये वायसीएम रुग्णालयातील वैशाली जामूनकर, आरती शिनलकर, रेश्मा शेख आणि उषा केंद्रे यांचा तसेच, थेरगाव रुग्णालयातील मोशीन शेख, भोसरी रुग्णालयातील शैलेश चावरे, आकुर्डी रुग्णालयातील आशिष तांबडे आणि जिजामाता रुग्णालयातील गौरव पवळ यांचा समावेश आहे. रुग्णाच्या प्रकृतीबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह हे स्वतः आढावा घेत आहेत. त्यांनी आवश्यक ती वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश वैद्यकीय विभागाला दिले आहेत.या रुग्णांच्या प्रकृतीविषयी महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह विशेष लक्ष ठेवून आहेत. तसेच, ते वेळोवेळी रुग्णांच्या प्रकृतीबद्दल माहिती घेत आहे. जखमी रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक मदतीसाठी पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या वतीने ससून रुग्णालयामध्ये मदतकक्ष सुरू करण्यात आला आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि 2 मदतनीस यांची 24 तास नेमणूक केली आहे.