ही एक शोकांतिका असल्याची उस्माननगर व परिसरात चर्चा…
दै.चालु वार्ता
उस्माननगर ( प्रतिनिधी )
लक्ष्मण कांबळे
नांदेड / उस्माननगर :- नांदेड जिल्हा प्रशासनाकडून ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील काही ठराविक गावांचा नविन तालुका व्हावा म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविला, मात्र उस्माननगर तालुका व्हावा म्हणून मागील तीस वर्षांपासूनची मागणी असून सुद्धा व जून्या काळात साडबाड तालुका म्हणून ओळख असणाऱ्या उस्माननगर या ग गावांचा प्रस्ताव शासनाकडे जात नाही ,ही एक शोकांतिका असल्याची उस्माननगर व परिसरातील नागरिकांतून चर्चा होताना दिसत आहे.
राज्यातील मोठे आणि दुर्गम तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुके निर्माण करण्याची कार्यवाही तीन महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत दिली. जिल्हा प्रशासनानेदेखील पाच तालुका निर्मितीचे प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.पण निजाम काळात तालुक्याचे ठिकाण असणारे व १९९२ पासूनचा प्रस्ताव असूनसुद्धा उस्माननगरचा जिल्हा प्रशासनाला विसर
पडल्याचे दिसत आहे.
राज्यात मोठ्या व दुर्गम तालुक्यांचे विभाजन करून नवीन तालुके निर्माण करण्याची कार्यवाही तीन महिन्यांत पूर्ण होणार आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये पाच नवे तालुके निर्मितीबाबत आशा निर्माण झाली आहे. दक्षिण मतदारसंघात असणारे व निजाम काळात तालुक्याचे ठिकाण राहिलेले उस्माननगर या गावाला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी १९९२ पासूनची मागणी आहे. त्यावेळी दिवंगत माजी सभापती लोकनेते माधवराव पांडागळे यांनी ही मागणी माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याकडे केली होती. २०१४ मध्ये पंचायत समिती कंधारचे सभापती असताना बालाजी पांडागळे यांनी सुध्दा पंचायत समितीचा ठराव घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या
माध्यमातून शासनाकडे उस्माननगरला तालुक्याच्या दर्जा देण्यात यावा म्हणून शासन दरबारी प्रस्तावदेखील पाठवला होता, जिल्हा प्रशासनाकडून नांदेड तालुक्यातील नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर हदगाव तालुक्यातील तामसा, किनवट तालुक्यातून इस्लापूर आणि मुखेड तालुक्यातून मुक्रमाबाद या मोठ्या गावचे प्रस्ताव ऑक्टोबर महिन्यात शासनाकडे पाठविले असल्याची माहिती मिळाली, पण, गेल्या ३० वर्षापासूनची मागणी असूनसुद्धा उस्माननगरचा तालुका म्हणून प्रस्ताव जात नाही, ही शोकांतिका असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
उस्माननगर हे गाव निजामकालीन तालुक्याचे ठिकाण म्हणून होते. निजाम काळात सारभाड नावाने तालुका होता, त्यांचे रुपांतर उस्माननगर असे झाले. ३० वर्षापासूनची मागणी व प्रस्ताव देऊन सुद्धा डावलण्यात आले. मागील तीस ते पस्तीस वर्षांपासून उस्माननगर विकास परिषद तर्फे दरवर्षी शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे. मागील महिन्यात कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदरराव शिंदे, माजी सभापती बालाजी पांडागळे , शेकापचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर , अमिनशाह फकीर, रशिद खान पठाण , प्रा.विजय भिसे , कमलाकर शिंदे , दत्ता घोरबांड, गंगाधर भिसे ,यांच्या सह अन्य पदाधिकारी , विकास परिषदेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख व पदाधिकारी यांच्याकडून नांदेड जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन देण्यात आले होते.त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी उस्माननगरचा प्रस्ताव ताबडतोब पाठविण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले होते. सारभाड नावाने अनेक कागदपत्रे सापडले असल्याचे जिल्हाधिकारी यांनी भेटायला गेलेल्या शिष्टमंडळाला सांगितले होते . उस्माननगर तालुका होण्यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाकडून महाराष्ट्र शासनास प्रस्ताव पाठवावा व तालुका निर्मितीसाठी चालना द्यावी असे नागरिकांकडून चर्चा केली जात आहे.
