
दै.चालु वार्ता कुरूळा प्रतिनिधी वैजनाथ गिरी कंधार/ नांदेड
हिप्परगा (शहा) रस्त्यालगत व्यंकट संभाजी थोटे यांची शेती आहे.ता.१६ रविवार सायंकाळी सुमारे ६:०० वा पाऊस चालू असताना वीज पडून दोन म्हशी जाग्यावरच दगावल्याची घटना घडली असून यात पशुपालक मात्र थोडक्यात बचावला आहे.
कुरुळा येथील व्यंकट संभाजी थोटे यांच्या शेत सर्व्हे क्र.२७१ मध्ये शेतीलगत असलेल्या बांधावर लिंबाच्या झाडाखाली दोन म्हशी बांधलेल्या होत्या.अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाला सुरवात झाली.पावसाचा जोर वाढला आणि कालव्यातून पाणी वाहायला सुरवात झाली. शेतीच्या लगत असलेल्या कालव्यात थोटे यांची दुचाकी होती.ती वाहून जाईल या भीतीपोटी दुचाकीकडे त्यांनी धाव घेतली दरम्यान जोराचा आवाज होऊन वीज कडाडली आणि दोन्ही म्हशी क्षणार्धात दगावल्या. दुचाकीमुळे थोटे यांचे प्राण वाचले परंतु म्हशी दगवल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले. यासंदर्भात प्रशासनाकडून सदरील घटनेचा पंचनामा सोमवार ता.१७ रोजी करण्यात आला आहे.