
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरामकर
( पुणे ) वाघोली : महापालिकेत समावेशानंतरही वाघोलीमध्ये ड्रेनेज लाइनची योग्य व्यवस्था नाही. त्यामुळे परिसरात नेहमीच स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत आहे.सांडपाणी उघड्यावर सोडले जात असल्याने आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांकडून आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, तथा शिवसेना (उद्धव ठाकरे) निवडणूक समन्वयक शिरूर-हवेली विधानसभा ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी सहायक उपायुक्त सोमनाथ बनकर यांची भेट घेत ड्रेनेज लाइनची गंभीर समस्या सोडविण्याची आग्रही मागणी केली, बनकर यांनी वाघोली परिसरातील गृहनिर्माण सोसायट्यांची पाहणी करीत ही समस्या तातडीने सोडविली जाईल, वाघोली परिसरासाठी प्रस्तावीत ड्रेनेज लाइनच्या कामाच्या निविदा मंजूर केल्या जातील, असे सांगितले.
वाघोली परिसराचे नागरीकरण वेगाने होत असताना नागरी समस्यांही वाढत आहेत. ड्रेनेज लाइनची समस्या मोठी आहे. संपूर्ण परिसरात ड्रेनेज लाइनचे जाळे टाकणे तसेच ते सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला (एसटीपी) जोडणे, हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी वाघोलीकरांकडून सातत्याने होत आहे, याबाबत महापालिकेकडे पाठपुरावाही करीत असल्याचे कटके यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर सहायक उपायुक्तांच्या पाहणी दौऱ्याचे आयोजन कटके यांनी केले होते. यावेळी सहायक उपायुक्त बनकर यांनी आदित्य ग्रीन सोसायटी, नगर रोड वाघोली, आयव्ही इस्टेट गुलमोहर प्रीमाइसेस, अंशुल कॅनवास आयव्ही इस्टेट रोड, पेरिविंकल सोसायटी आयव्ही इस्टेट रोड , कांचनपुरम सोसायटी बायफ रोड, सवाना सोसायटी बायफ रोड आदी सोसायट्यांसह लोहगाव रोड, फुलमळा रोड, भावडी रोड व वाघोलीतील सर्वत्र ठिकाणी साचलेल्या पावसाच्या पाण्याची तसेच बायफ रोड येथील चालू असलेल्या ड्रेनेज लाइनची महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्यासमवेत पाहणी केली.
यावेळी ज्ञानेश्वर कटके यांनी उपायुक्त बनकर यांच्याशी नागरिकांचा थेट संवाद घडवून आणला. जागेवर जात पाहणी करीत समस्या जाणून घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. याबाबत ज्ञानेश्वर कटके यांनी सांगितले की, पुणे महापालिकेकडे यापूर्वीही ड्रेनेज समस्या मांडली आहे. या भागात असंख्य गृहनिर्माण सोसायट्या बेधडकपणे बांधल्या गेल्या, ड्रेनेज लाइन अभावी उघड्यावर सांडपाणी सोडले गेले. तेच पाणी रस्त्यावर सांडते. रस्ते निसरडे होतात. काही ठिकाणी कुपनलिका, विहिरींचे पाणीही खराब झाले आहे. गंभीर बाब सहायक उपायुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे. वाघोेली परिसरातील विविध कामांच्या निविदा तातडीने मंजूर करण्याची मागणी ज्ञानेश्वर कटके यांनी सहायक उपयुक्त बनकर यांच्याकडे केली आहे.
वाघोली परिसरातील ड्रेनेज लाइनच्या समस्या असलेल्या ठिकाणांची पाहणी जि.प.सदस्य कटके यांच्या समवेत केली आहे. नागरिकांनीही अनेक समस्या मांडल्या, त्याची नोंद घेण्यात आली असून त्यानुसार या भागात ड्रेनेज लाइनचे काम लवकरात लवकर सुरू करण्याबाबत प्रयत्न केले जातील, तसेच, प्रस्तावित कामांच्या निविदाही मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
– सोमनाथ बनकर, सहायक उपायुक्त, मनपा, पुणे.