राज्यात परतीच्या पावसाची चर्चा असताना आता पावसाने चांगलाच जोर धरला आहे. काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे. तर दुसरीकडे ऑक्टोबर हीटमध्ये उन्हाच्या झळांनी नागरिकांचा जीव बेहाल झाला आहे.
अशावेळी महाराष्ट्रावर संकटाचं सावट घोंगावताना दिसतंय. नेमकी कुठे काय परिस्थिती आहे जाणून घेऊया.
दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आलेला असताना यावेळी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. याचं कारण म्हणजे आजही राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील ‘या’ भागांना सतर्कतेचा इशारा..!
ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ताशी 30-40 किमी वाऱ्याचा वेग असेल. वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज आहे.
पुणे शहर आणि परिसरात हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुणे घाटमाथ्यावर काही दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज 28 अंश सेल्सिअस कमाल आणि 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असू शकते. त्याचबरोबर, विदर्भातील भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम पाऊस पडू शकतो. नागपूरमध्ये आज 26 अंश सेल्सिअस कमाल आणि 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असण्याचा अंदाज आहे.
मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडू शकतो.
मुंबईत हवामानाचा अंदाज काय..?
मुंबईत ढगाळ वातावरण असण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबईचे कमाल तापमान आज 27 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस असण्याचा अंदाज आहे.
