
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसे उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत 45 उमेदवारांचा समावेश आहे. शिवाय मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा देखील या यादीत समावेश आहे.
ते माहीम विधानसभा मतदारसंघातून (Mahim Assembly Election) निवडणूक लढवणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून अमित ठाकरे याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं…
अमित ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे आता आदित्य ठाकरे यांच्या नंतर ठाकरे घराण्यातले दुसरे पुत्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. तर अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
माहीम मतदारसंघातून अमित ठाकरेंना (Amit Thackeray) उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या रुपाने आणखी एक ठाकरे मैदानात उतरले आहेत, याबाबत संजय राऊतांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये सगळ्यांना शुभेच्छा द्यायच्या असतात.” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या…
शिंदेसेना विरुद्ध मनसे
माहीम मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात सदा सरवणकर विरुद्ध अमित ठाकरे यांच्यात सामना रंगणार आहे. दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेने अद्याप उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.
शिवाय अमित यांच्याविरोधात ठाकरे गट उमेदवारी देणार का? हे पाहणं देखील महत्वाचं आहे. कारण, आदित्य ठाकरे जेव्हा 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरले होते. तेव्हा मनसेने वरळी विधानसभेत उमेदवार दिला नव्हता. ज्यामुळे आदित्य यांना निवडणूक जिंकण सोपं झालं होतं. त्यामुळे आता उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवारी जाहीर करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे..
भाजप, शिवसेना अन् मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर..
विधानसभेसाठी भाजप आणि शिंदेसेनेकडून उमेदवारांची पहिली तर मनसेकडून दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार भाजपकडून 99 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून 45 आणि मनसेकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे…