
दै चालु वार्ता प्रतिनिधी
मावळ/पिंपरी
बद्रीनारायण घुगे
मावळ विधानसभेचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर करण्यात आली. यामध्ये मावळ विधानसभेसाठी आमदार सुनील शेळके यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मावळ मतदार संघ भाजपला सुटणार का अथवा येथील उमेदवार बदलला जाणार का या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा ९४ हजार मतांच्या फरकांनी पराभव करत आमदार सुनील शेळके यांनी मावळच्या जागेवर राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक केली होती. मागील पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तब्बल पाच हजार कोटीहून अधिक रुपयांचा निधी मावळ तालुक्यात आणत त्यांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली आहेत. मावळ तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होत येथील प्रत्येक नागरिकाच्या हाताला स्वतःचा रोजगार व व्यवसाय मिळावा यासाठी त्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. महिला भगिनींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरावा यासाठी त्यांनी जलजीवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात गावोगावी पाणीपुरवठा योजना राबवले आहेत. शिवण क्लासच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वयंपूर्ण केले आहे. विविध भागातील पूल, रस्ते ही कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून ग्लास स्काय वॉक सारखा जागतिक प्रकल्प लोणावळ्यात आला आहे. मावळ तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून कान्हे फाटा व लोणावळा या ठिकाणी दोन उपजिल्हा रुग्णालय मंजूर करत त्यांची कामे अंतिम टप्प्यात आणली आहेत. कोरोना काळात त्यांनी तालुक्यातील जनतेला कुटुंबा प्रमाणे सांभाळले. विविध शासकीय कार्यालयांनी कामे सुरू आहेत. अशा विविध प्रकारे विकास कामे करत त्यांनी मावळातील नागरिकांना न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला आहे. त्यांच्या याच कामाची दखल घेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आमदार सुनील शेळके यांना पुन्हा दुसऱ्यांदा मावळ विधानसभेसाठी संधी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीमध्ये आमदार सुनील शेळके यांचे नाव समाविष्ट आहे.
वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे हे देखील यावेळी मावळ विधानसभेसाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र आमदार सुनील शेळके यांनी केलेली विकास कामे व जनतेचा त्यांना असलेला पाठिंबा पाहूनच ही उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. बापूसाहेब भेगडे यांना देखील पक्षाकडून महामंडळ देण्यात आले होते. मात्र मला महामंडळ नको, मावळची उमेदवारी द्या अशी मागणी बापूसाहेब भेगडे यांनी पक्षाकडे केली होती. त्यांच्या मागे देखील कार्यकर्त्यांचा मोठा समूह आहे. महायुती मधील घटक पक्ष असलेल्या भाजपने देखील ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटावी याकरता जोरदार प्रयत्न केले होते. रवींद्र भेगडे हे याकरिता इच्छुक होते. मात्र ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला जागा या न्याय तत्त्वानुसार महायुतीतील जागा वाटपामध्ये सदरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वाट्याला आली असून पक्षाकडून सुनील शेळके यांच्या अधिकृत उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे पक्षातील दुसरे प्रमुख दावेदार असलेले बापूसाहेब भेगडे हे काय भूमिका घेणार याकडे आता सर्व मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे.
दरम्यान गुरुवारी २४ ऑक्टोबर रोजी आमदार सुनील शेळके आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या सह वडगाव मावळ येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ज्या पोटोबा महाराजांच्या मंदिरात शपथ घेऊन मागील वर्षी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, त्याच पोटोबा महाराजांच्या दर्शनाने या वर्षी देखील जाहीर झालेल्या उमेदवारीचे स्वागत केले जाणार असल्याचे आमदार सुनील शेळके युवा मंचच्या वतीने सांगण्यात आले आहे.