
अलिकडच्या राजकारणातील मुत्सद्दी अशी ओळख निर्माण झालेले व ठाकरेंनाही झटका देत शिवसेना आपल्याकडे घेतलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बीड जिल्ह्यातील एकमेव जागाही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदरात टाकली.
त्यामुळे या निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनचा धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. मुख्यमत्र्यांनी रणांगण आंदन दिले असले तरी त्यांचा शिलेदार बंडखोरी करत मैदानात थांबला आहे.
शिवसेना जिल्हापमुख अनिल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेची ताकद हळुहळु घटवत पक्षाचा वाघ बीडच्या पिंजऱ्यात कैद केला होता. या निवडणुकीत तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशा वाटाघाटी केल्या याचे कोडे शिवसैनिकांनाही उलगडायला तयार नाही.
भलेही त्यांच्या पक्षात निवडणुक लढविण्यासारखा नेता नसला तरी एखाद्या जिल्ह्यातून पक्षाचे चिन्हच निवडणुकीतून गायब होणे अशी भूमिका एकनाथ शिंदेंनी घेतली. जागा सोडण्याऐवजी त्यांनी राणे, दानवे – जाधव पॅटर्न प्रमाणे मित्रपक्षातील नेत्याला आपल्या पक्षात घेत उमेदवारी द्यायचाही पर्याय पक्षाच्या दृष्टीने बरा राहीला असता.
मात्र, बीडची जागा त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहाल करुन टाकली. महायुतीत कधीकाळी मोठा पक्ष असलेला शिवसेना पक्ष जिल्ह्यात आता शुन्यावर आला आहे. परंतु, शिवसेनेकडून निवडणुक लढविण्यासाठी तयारीत असलेले अनिल जगताप यांनी मात्र बंडखोरी करत बीडमध्ये अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बहुतांशी ठिकाणच्या बंडखोरी मोडीत काढल्या.
परंतु, बीड जिल्ह्यातील बंडखोरी रोखण्यात या नेत्यांना यश आलेले नाही. बीडमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी आपली उमेदवारी कायमच ठेवली. याचा एक अर्थ म्हणजे सरदारांनी जरी रणांगण आंदण दिले असले तरी आम्ही शरणागती पत्कारण्याऐवजी लढणारच, असा संदेश जगताप यांनी दिला आहे. या लढाईमुळे आता महायुतीची डोकेदुखी तर वाढलीच आहे, शिवाय मुख्यमंत्र्यांची देखील.