
पुणे:दारव्हा शहरातून जाणाऱ्या दिग्रस बायपासवर मंगळवारी सायंकाळी तपासणी पथकाने कारची झडती घेतली. यामध्ये तब्बल १४ लाख २५ हजारांची रोख आढळून आली. तर यवतमाळ शहरात मंगळवारी रात्री दुचाकीस्वाराजवळ ५ लाख १३ हजार रुपये रोख मिळाले.
दोन कारवाईत १७ लाखांची रोख जप्त झाली.
दारव्हा शहराकडून एमएच-३१, एफए-७४२७ क्रमांकाची कार दिग्रसकडे जाताना बायपासवरील स्थिर तपासणी नाक्यावर थांबविण्यात आली. या वाहनाची तपासणी पथकाने झडती घेतली. १४ लाख २५ हजारांची रक्कम आढळून आली.
मनोज कुमार मोटवाणी (रा. हिंगणघाट) हे ही रक्कम घेऊन जात होते. पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी प्लॉट विक्री केला, त्याच्या इसाराची रक्कम असल्याचे सांगितले आहे. तर यवतमाळ शहरातील सिघानियानगर येथे एलसीबी पथकाने दुचाकीवरून जाणाऱ्या अजिंक्य गटलेवार रा. वैद्यनगर याची झडती घेतली. त्याच्याजवळ पाच लाख १३ हजारांची रोख आढळली. याबाबत विचारणा करताच नागरी सहकारी पतसंस्थेचा कर्मचारी असल्याचे त्याने सांगितले. याबाबत कुठलेही ओळखपत्र त्याच्याकडे नसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष रोख जप्तीची कारवाई केली.