
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका राज्यभर सुरू आहे. दरम्यान, शिवसेना आणि मनसेला सभांसाठी मुंबईत शिवाजी पार्क मैदान मिळण्याची शक्यता कमी आहे. दोन्ही पक्षांनी सभेसाठी मैदान मिळू शकणार नाही.
वर्षात फक्त ४५ दिवस हे मैदान कार्यक्रमांसाठी वापरण्याची मर्यादा आहे. ती मर्यादा संपल्याने या दोन्ही पक्षांच्या सभांसाठी मैदान उपलब्ध नसेल.
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी सर्वच पक्षांनी अर्ज दाखल केले होते. यात भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिंदेसेनेला सभेसाठी परवानगी मिळाली. या पक्षांनी सर्वात आधी अर्ज केले होते. त्यामुळे त्यांना मैदान मिळाले. पण ४५ दिवसांची मर्यादा संपल्यानं मनसे आणि ठाकरे गटाला मात्र मैदान मिळणार नाही.
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने शिवाजी पार्कचं मैदान सभेसाठी मिळावं म्हणून अर्ज केला होता. दोन्ही पक्षांकडून १७ नोव्हेंबरला मैदान मिळावं अशी मागणी करण्यात आली होती. आता याबाबतचा प्रस्ताव पालिका आयुक्तांना पाठवला जाणार असून अंतिम मंजुरी नगरविकास खात्याकडून दिली जाईल.
विधानसभा निवडणूक जाहीर होताच सभेला मैदान मिळावं यासाठी मनसेने १४ ऑक्टोबर रोजी अर्ज केला. तर १५ ऑक्टोबरला त्यांनी पुन्हा अर्ज दिला. तेव्हाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अर्ज दाखल करण्यात आला. मात्र शिवाजी पार्कवर सभेसाठी शिंदेसेनेनं १० नोव्हेंबर, भाजपने १२ नोव्हेंबर तर अजित पवार गटाने १४ नोव्हेंबर या तारखांसाठी अर्ज केले होते. या तिन्ही पक्षांना सभेसाठी परवानगी मिळाली. यामुळे मैदान वापरण्याची मर्यादा संपल्यानं १७ नोव्हेंबरच्या सभेसाठी मनसे आणि ठाकरे गटाला परवानगी नाकारण्यात आली.