
दै.चालु वार्ता
उदगीर, प्रतिनिधी
अविनाश देवकते
लातूर (उदगीर) : उदगीर तालुक्यातील गुडसूर मधील प्रसिद्ध कोरडवाहू शेतकरी संजय माधवराव बंडे यांच्याकडे असलेल्या लाल कंधारी गाईने जुळ्या गोऱ्यांना जन्म दिला आहे.
भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे बैल, गाय यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. बैलामुळेच आपली शेती आहे. शेतकऱ्यांना बैलाची खूप साथ आहे. पेरणी, नांगरणी, दुंडे, कोळपणी, रास घरी घेऊन येणे अशी अनेक कामे बैलांच्या साहाय्याने केली जातात. पण आज आपण पाहतो जनावरांचे प्रमाण खूप कमी झाले आहे. त्यातच संजय बंडे हे पशुधन सांभाळताना दिसतात.
एकाच वेळी दोन कारवडी किंवा एक कारवड व एक गोरे अशी अनेक उदाहरणे सापडतात परंतु जुळे गोरे जन्माला आलेला हा दुर्मिळ प्रकार मात्र गुडसूर गावामध्ये पहिल्यांदाच घडला, असे वर्णन गावातील जेष्ठ शेतकरी पाहायला आल्यानंतर करत आहेत.
पशुधनाच्या बाबतीत गुडसूर गाव उदगीर पंचक्रोशीत व देशभरात प्रसिद्ध आहे कारण गावातील देवणी जातीचा वळू दिल्ली पर्यंत पोहंचला आणि पारितोषिक मिळवून दिला. ही कामगिरी करणारे शेतकरी देखील विश्वनाथ बंडे आहेत आणि ते हैद्राबाद मुक्तिसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिक पण होते. शेतकरी संजय बंडे हा त्यांचा चुलत नातू आहेत. त्र्यंबकराव शेटकार यांची गाय माळेगाव यात्रेत प्रथम आली होती, तोच वारसा गुडसूरचे पशुपालक पुढे चालवत आहेत .
अनेक गाईंनी जुळ्यांना जन्म दिला हे आपण नेहमी ऐकले आहे पण मात्र एक दूर्मिळ योग जुळून आला आणि गाईने दोन गोऱ्यांना जन्म दिला .
गावातील अनेक पशुप्रेमी शेतकऱ्यांनी त्याची पाहणी करुन पशुपालक तथा शेतकरी संजय बंडे यांचे अभिनंदन राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सहशिक्षक विश्वनाथ मुडपे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य धनंजय गुडसूरकर, विश्वनाथ होळसंबरे, विठ्ठल मरलापल्ले, विनोबा पाटील, एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, सोपान मुस्कावाड राजीव पाटील, शिवाजी मुडपे, धोंडीराम मोरतळे, प्रा धनराज बंडे व गावातील प्रतिष्ठित शेतकऱ्यांनी केले आहे.