
श्री क्षेत्र नारायणगडावरील मेळाव्याला मिळालेला उदंड प्रतिसाद व मेळाव्यातील घोषणेनंतर निवडणूक लढविण्याबाबतची मिमांसा करुन आता लढण्याऐवजी ‘गनिमी कावा’ अशी घोषणा करणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील आता स्पष्ट भूमिका घेणार की निरोप देणार?
याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निरोप कोणासाठी येणार या कन्फ्युजनमुळे प्रमुख उमेदवारांची पाचावर धारण आहे. बीडमध्ये अपक्ष डॉ. ज्योती मेटे व अनिल जगताप यांच्या एकत्रीकरणासाठी काही जाणकारांनी पुढाकार घेतला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलनाचे केंद्र अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) असले तरी त्यांची जन्मभूमी बीड जिल्हा असल्याने त्यांच्या प्रत्येक आवाहनाला बीड जिल्ह्यात समाज बांधवांकडून कायमच उदंड प्रतिसाद मिळालेला आहे.
मागच्या वर्षीच्या आंदोलनांतील साखळी उपोषण, रास्ता रोको आणि त्यानंतर भली मोठी अंतिम इशारा सभाही जिल्ह्यात झाली. त्यांनी विविध जिल्ह्यांत काढलेल्या शांतता फेऱ्यांमध्ये बीडची शांतता फेरीचा प्रतिसादही सर्वाधिक होता. मागच्याच महिन्यात श्री क्षेत्र नारायणगडावरील मनोज जरांगे पाटलांचा दसरा मेळाव्याची गर्दीही लाखोंत होती. त्यामुळे जरांगे पाटील आणि बीड जिल्हा अतुट नात्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
दरम्यान, मेळाव्यात पाटलांनी ‘उलथापालथ’ करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांनी मराठा, मुस्लिम, दलित समिकरण जुळवित निवडणुकीत थेट उतरण्याचीही घोषणा केली. परंतु, पुन्हा त्यांनी ‘गनिमी कावा’ म्हणत निवडणुकीतून माघार घेतली. परंतु, आता जरांगे पाटील जिल्ह्याबाबत काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, बीड मतदार संघात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका निर्णायक ठरु शकते म्हणून त्यांच्याकडून उमेदवारीसाठी साधार २० जणांनी अर्ज भरले होते. पाटलांच्या भूमिकेनंतर शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ. ज्योती मेटे व अनिल जगताप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता या दोघांनी एकत्र यावे यासाठी समाजातील काही प्रतिष्ठित व पाटलांचे समर्थक प्रयत्नशिल आहेत. मात्र, आजपर्यंत तरी याला यश आलेले नाही. त्यामुळे आता बीडबाबत देखील पाटील काय भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले आहे.
मध्यरात्रीही समाजबांधवांची हजेरी
निवडणुकीचा निर्णय मागे घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या आठवड्यात जिल्ह्याचा दौरा केला. ज्या गावात रात्री सात वाजताची भेट होती, तीथे मध्यरात्री साडेतीनला पोचलेल्या जरांगे पाटलांच्या संवाद बैठकीला तेवढाच प्रतिसाद मिळाला. म्हणजे लोकांची जरांगे पाटलांशी जुळलेली नाळ कायम असल्याचे स्पष्ट आहे. त्यांची नैतिकता, त्यांनी समाजासाठी कुटूंबापासून दुर राहण्याचा केलेला त्याग आणि आंदोलनामुळे जिल्ह्यात आढळलेल्या कुणबी नोंदी व त्यामुळे मिळालेले एक लाखांवर कुणबी – मराठा प्रमाणपत्र यामुळे समाज घटक त्यांच्याशी घट्ट आहे.